सायलंट किलर खंदेरी अत्याधुनिक पाणबुडी

Published On: Sep 28 2019 1:21AM | Last Updated: Sep 27 2019 7:55PM
Responsive image

अभ्युदय रेळेकर


सायलेंट किलर म्हणून ज्या पाणबुड्यांची ख्याती आहे अशा कलवरी जातीच्या पाणबुड्यांमधील एक खंदेरी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दि. २८ सप्टेंबरला सामिल होत आहे. मुंबईत या पाणबुडीला नौदलाच्या स्वाधीन करण्यात येईल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ही पाणबुडी नौदलाच्या स्वाधीन करतील. मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार झालेल्या या पाणबुडीचे २०१७ साली जलावतरण करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याच्या नावावरुन या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले आहे. जलदुर्ग असलेल्या खंदेरी किल्ल्याचे नाव या पाणबुडीला दिलेले आहे. चहुबाजून पाण्याने घेरलेला खंदेर जलदुर्ग जसा अभेद्य होता तशीच ही पाणबुडी अभेद्य अशी आहे.

या पाणबुडीचे गेले दोन वर्षे कठोर परीक्षण करण्यात आले. त्यानंतर आता ही पाणबुडी नौदलाकडे सोपवण्यात येणार आहे. डिझेल आणि इलेक्ट्रिसिटी अशा हायब्रिड इंधनावर चालणाही ही पाणबु़डी आहे. समुद्र किनाऱ्यावर राहून ३०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. ही पाणबुडी भारतीय नौदलात सामिल झाल्यानंतर नौसेनेची ताकद वाढणार आहे.

पाणबुडीची क्षमता प्रामुख्याने दोन निकषांवर आधारित असते. पहिली म्हणजे तिची पाण्यात जास्तीत जास्त काळ राहण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे त्या पाणबुडीची मारक क्षमता. या पाणबुडीचा विचार करता ४५ दिवस ही पाणबुडी पाण्याखाली राहू शकते. या पाणबुडीवर पाण्यातून मारा करणारी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. ही पाणबुडी पाण्यातल्या पाण्यात आणि इतर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यास तयार आणि तत्पर अशी आहे. या पाणबुडीचा आकार ६७ मीटर लांब आणि सव्वा सहा मीटर रुंद आहे. या पाणबुडीची उंची १२.३ मीटर इतकी आहे. या पाणबुडीचे वजन १५५० टन एवढे आहे. यामध्ये ३६ पेक्षा जास्त नौसैनिक राहू शकतात. तसेच या पाणबुडीचा वेग ताशी ३५ किलोमीटर एवढा आहे. पाणबुडीचे वैशिष्ठ्य म्हणजे ही पाणबुडी ३०० मीटर खोलीपर्यंत समुद्रात जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही रडारच्या कक्षेत ही पाणबुडी येत नाही.

प्रामुख्याने इंधनासाठी बॅटरीचा वापर या पाणबुडीमध्ये करण्यात आला आहे. पाणबुडीत ७५० किलो वजनाच्या ३६० बॅटरी बसवण्यात आलेल्या आहेत. तसेच या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी २ डिझेल जनरेटर बसवण्यात आलेले आहेत. एकदा पाण्याखाली गेल्यावर ही पाणबुडी १२,००० किलोमीटरचा प्रवास एका दमात करु शकते.

अथांग समुद्रात कोणताही बोभाटा न करता सुखनैव संचार करणारी पाणबुडी म्हणून या पाणबुडीची ख्याती आहे. म्हणूनच या पाणबुडीला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. जगातील सर्वात शांत पाणबुडी असा बहुमान या प्रकारच्या पाणबुडीला मिळाला आहे. बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या कोणताही आवाज न करता कशा शांतपणे रस्त्यावर चालताना दिसतात. तशीच ही पाणबुडी अथांग समुद्रात शांतपणे संचार करत असते.

या पाणबुडीमध्ये इंजिनाच्याबरोबरच शत्रुला उद्ध्वस्त करण्यासाठी उपयुक्त अशी १०० पेक्षा जास्त उपकरणे बसवण्यात आली आहेत. अत्याधुनिक रडार आणि सोनार मशिन्सही या पाणबुडीमध्ये बसवण्यात आली आहेत. ही पाणबुडी अत्यंत शांत असल्याने या पाणबुडीचा रडारला पत्ताच लागत नाही.