Thu, Apr 25, 2019 06:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिग्नल शाळेच्या मोहन काळे, दशरथ पवारने मिळविले यश

सिग्नल शाळेच्या मोहन काळे, दशरथ पवारने मिळविले यश

Published On: Jun 09 2018 1:57AM | Last Updated: Jun 09 2018 1:41AMठाणे : प्रतिनिधी

सिग्नल शाळेत शिकणार्‍या मोहन काळे व दशरथ पवार या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत मार्क मिळवित घवघवीत यश संपादन केले आहे. समर्थ भारत व्यासपीठची सिग्नल शाळा आणि महापालिका शाळांतील शिक्षकांनी घेतलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना व्यक्त करीत सर्व शिक्षकांनी दोघांचे कौतुक केले. मोहनने 76 टक्के, तर दशरथने 64 टक्के गुण  मिळविले आहेत.  शिक्षणाची इच्छा होती; परंतु घरची खडतर परिस्थिती असल्याने दोघांनी केवळ 5 वी ते 6 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर 8 ते 9 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सिग्नल शाळेमुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करत आपल्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे त्यांनी ठरविले. 19 वर्षीय मोहन व 16 वर्षीय दशरथ यांनी प्रदीर्घ काळाने पुस्तक हातात घेतले. त्यांना लगेचच दहावीला बसविणे अशक्य होते. मात्र त्यांच्या भविष्याचा विचार करता निदान दहावी करण्याचा धाडसी निर्णय सिग्नल शाळेच्या टीमने घेतला. आरती परब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिक्षणाचे धडे पुन्हा गिरविण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या शाळा क्र.19 च्या मुख्याध्यापिका लोहकरे यांनी मोहनला व दशरथला शाळेत प्रवेश दिला. इच्छाशक्तीच्या जोरावर व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सुमन शेवाळे यांनी आपल्या घरी रात्रंदिवस मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. यासोबतच श्रद्धा दंडवते, दुर्गा खुरकुटे, स्वरुपा भोजेवार, ज्योती जावळे, पौर्णिमा करंदीकर यांनीही मार्गदर्शन केले.

शिक्षणापासून दूर असलेल्या लाखो मुलांसमोर मोहन आणि दशरथ यांनी आदर्श ठेवला असून आत्मविश्वास, मेहनत आणि मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. 
- भटू सावंत
समर्थ भारत व्यासपीठ

मोहन काळेचे वडील अपंग असून भीक मागतात, तर दशरथचे वडील हे काही कारणास्तव तुरुंगात आहेत. यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी या मुलांवर होती. घरची सर्व जबाबदारी आमच्यावर असल्याने आम्हाला शिक्षण सोडून द्यावे लागले.परंतु सिग्नल शाळा सुरू झाल्यानंतर आम्हालाही आपले शिक्षण पूर्ण करावे असे वाटू लागले. त्यातून आम्ही उत्तीर्ण झालो.