Mon, Mar 25, 2019 05:17
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिग्नल मेंटेनरच्या दक्षतेने मरे लोकलचा अपघात टळला

सिग्नल मेंटेनरच्या दक्षतेने मरे लोकलचा अपघात टळला

Published On: May 28 2018 1:49AM | Last Updated: May 28 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी

भायखळा रेल्वे स्थानकाजवळचा रेल्वे ट्रॅक... ट्रॅकवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे येत असलेली भरधाव आसनगाव फास्ट लोकल...  एक इसम हातातील वॉकीटॉकी उंच धरून लोकलकडे धावत आहे... हा इसम पाहून लोकलचा ड्रायव्हर संभ्रमात... हा आत्महत्या करण्यासाठी धावतो आहे की...?  मात्र, क्षणभरातच त्याच्या लक्षात येते, की तो गाडी थांबवण्यास सांगत आहे... ड्रायव्हर तातडीने गाडीचे ब्रेक दाबतो... गाडी थांबते. अन् पुढच्या काही क्षणांतच लोकलमधील शेकडो प्रवाशांच्या जिवावर बेतलेला एक भीषण रेल्वेअपघात टळतो! हा अपघात टळावा म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता रेल्वेरुळावरून वॉकीटॉकी हलवून लोकल थांबवण्याची  खूण करीत धावणार्‍या इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर संतोष कुमारचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तो रेल्वेसाठी आज हीरो ठरलाय.

इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर संतोष कुमार हे शनिवारी सिग्नलिंग केबिनमध्ये ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना ट्रॅक सर्किट लाईट्स सिग्नल मिळत असल्याचे निदर्शनास आले. हा सिग्नल म्हणजे रेल्वेरुळावर काहीतरी अडचण असल्याची सूचनाच. त्यामध्ये सिग्नलमधील बिघाडापासून रेल्वेरुळाच्या तुटण्यापर्यंत काहीही असू शकते. साहजिकच या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन संतोष कुमार हे तातडीने रेल्वे ट्रॅकवर उतरले व त्यांना जवळच रेल्वे ट्रॅकला आडवा तडा गेल्याचे/भेग पडल्याचे निदर्शनास आले. या टॅ्रकवरून गाडी आली तर ती निश्‍चितच रुळावरून घसरणार हे ठरलेलेच. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने वॉकीटॉकीवर भायखळ्याच्या सेंट्रल केबिनमधील कंट्रोलरशी संपर्क साधला. मात्र, तोपर्यंत त्या ट्रॅकवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद आसनगाव गाडी मार्गस्थ झाली होती!

रुळाला पडलेल्या आडव्या तड्याने तिकडे कंट्रोलरपासून सर्व जण आता काय होतेय, या चिंतेत. हातात अत्यंत अपुरा वेळ... गाडी तर कधीही येईल... तो क्षणात निर्णय घेतो, निर्धार करतो व गाडी थांबवण्यासाठी रुळावरून पुढे धावत सुटतो... त्याच्या प्रयत्नांना फळ येते व लोकल ट्रॅकला तडा पडलेल्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर थांबते! काही सेकंदांचाच फरक... संतोष कुमारच्या या जिवावर बेतलेल्या प्रयत्नामुळे गाडी डिरेल होण्यापासून वाचण्याबरोबरच शेकडो प्रवाशांचे प्राण वाचण्यास मदत होते. 2007 मध्ये रेल्वे सेवेमध्ये दाखल झालेला संतोष कुमार आज रेल्वेसाठी हीरो ठरला आहे.