Sun, Mar 24, 2019 12:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संघवी हत्या : चौकशीसाठी गुन्हे शाखा पथक कोल्हापुरात

संघवी हत्या : चौकशीसाठी गुन्हे शाखा पथक कोल्हापुरात

Published On: Sep 11 2018 1:38AM | Last Updated: Sep 11 2018 1:38AMमुंबई : प्रतिनिधी

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या बेपत्ता प्रकरणाची उकल करत पोलिसांनी मारेकर्‍याला अटक केली. कर्ज फेडीसाठी लुटीच्या हेतूने केलेला प्रयत्न फसला म्हणून संघवी यांची हत्या केल्याचे त्याने पोलिस चौकशीत सांगितले आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी कोल्हापूरमध्ये पोहोचले असल्याने संघवी यांच्या हत्येमागचे नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोअर परळच्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये असलेल्या बँकेच्या कार्यालयातील काम आटोपल्यानंतर संघवी हे पाच सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास घरी जाण्यासाठी बाहेर  पडले. दहा वाजले तरी ते घरी न पोहोचल्याने त्यांच्या पत्नीने फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोबाईल बंद होता.

पत्नीने कार्यालयात फोन करून विचारणा केली असता संघवी कार्यालयातून घरी जाण्यासाठी नेहमीप्रमाणे बाहेर पडल्याची माहिती मिळाली. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे असा सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांच्या पत्नीने ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

ना. म. जोशी मार्ग पोलिसांसह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संघवी यांचा शोध सुरू केला. दुसर्‍या दिवशी नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात संघवी यांची रक्‍ताने माखलेली कार पोलिसांना सापडली. तपास सुरू असताना एका अज्ञात व्यक्‍तीचा संघवी कुटुंबियांना फोन आला. फोन करणार्‍या व्यक्‍तीने, तुमचा मुलगा व्यवस्थित आहे, काळजी करू नका. लवकरच फोन येईल, असे सांगून फोन बंद केला.
संघवी यांच्या पत्नीने ही माहिती लगेचच पोलिसांना दिली. पोलिसांनी हा मोबाईल नंबर तपासला असता, तो मारेकरी आरोपी सरफराज शेख (वय 20) याचा असल्याचे उघड झाले. सरफराजने संघवी यांच्या मोबाईलमध्ये आपल्याजवळील सिमकार्ड घालून फोन केला होता. याच मोबाईलच्या आधारे माग काढत पोलिसांनी सरफराजला ताब्यात घेतले. त्याने संघवी यांच्या गुन्ह्याची कबुली देत, मृतदेह कल्याणच्या हाजीमलंग जंगलात फेकल्याची माहिती पोलिसांना दिली. सोमवारी सकाळी पाण्याच्या डबक्याजवळ संघवी यांचा मृतदेह सापडला.

पैसे भरण्यासाठी सरफराजला बँकेतून वारंवार फोन येत होते. त्यामुळे त्याने संघवी यांना लुटण्याचा प्लॅन आखला. त्याने संघवी यांना चाकूच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्याने संघवी यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

सहकार्‍यानेच घडवली हत्या पथक कोल्हापुरात

बँकेमध्ये 2007 साली वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून रुजू झालेल्या सिद्धार्थ संघवींना गेल्या अकरा वर्षांमध्ये तीन बढत्या मिळून ते उपाध्यक्ष बनले होते. संघवींना देण्यात आलेल्या बढत्यांचा त्यांच्या सहकार्‍यांमध्ये असंतोष होता. यातूनच संघवी यांचा काटा काढण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर येत होती. मात्र, पोलिसांनी सरफराज शेख याला अटक करून त्याला झालेल्या कर्जातून लुटीच्या हेतूने केलेला प्रयत्न फसला म्हणून संघवी यांची हत्या केल्याचा दावा केला आहे. स्थानिक पोलिसांनी हा दावा केला असला तरी गुन्हेशाखेचे पथक मात्र वेगळ्या दिशने तपास करत कोल्हापूरला तपासासाठी पोहोचल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.