Sat, Mar 23, 2019 16:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संजय निरुपम यांचाही माफीनामाफेम केजरीवाल होईल : श्‍वेता शालिनी

संजय निरुपम यांचाही माफीनामाफेम केजरीवाल होईल : श्‍वेता शालिनी

Published On: Jul 04 2018 2:16AM | Last Updated: Jul 04 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

भ्रष्टाचाराचे एक तरी प्रकरण  सापडेल म्हणून आशाळभूतपणे वाट बघणार्‍या कांग्रेस पक्षाने शेवटी खोटारडेपणाने काहीही तथ्य नसलेले प्रकरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  पण तो त्यांच्याच अंगाशी येणार आहे या शब्दात भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी, संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना सणसणीत प्रत्युत्तर दिले. 

जी जमीन सिडकोची असल्याचे  निरुपम यांनी सांगितले, ती शासकीय जमीन असून तिची  किंमत निरुपम यांनी सांगितल्यानुसार 1700 कोटी  नसून अवघी 5.29 कोटी रुपये आहे. ही जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्याचा निर्णय प्रथेप्रमाणे जिल्हाधिकार्‍यांच्या पातळीवर झाला असून या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने या पूर्वीच खारिज केली आहे. 

अनेक वर्षांपासून याप्रकारचे व्यवहार जिल्हाधिकारी  पातळीवर हाताळले  जात असून मुख्यमंत्र्यांपर्यंत या फाईल्स येतही नाहीत. असे  असताना   हा मोठा घोटाळा  आहे असे भासविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हास्यास्पद आहे असे श्वेता शालिनी यांनी सांगितले. 

काल्पनिक प्रकरणे निर्माण करून मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करू पाहणार्‍या काँग्रेसने आधी आपल्या पायाशी काय जळते आहे ते बघावे या शब्दात श्वेता शालिनी यांनी  काँग्रेसने आजवर केलेल्या विविध घोटाळ्यांची माहिती दिली आदर्श घोटाळ्याबाबत सगळेच जाणतात. पण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील 2500 कोटी किमतीची 102 एकर जमीन खासगी बिल्डरला अवघ्या 4058 रुपयात देऊन टाकायची होती. ग्रामीण विकास व  पंचायती राज्य मंत्री असताना श्री. विलासराव देशमुख यांनी त्यांचे चिरंजीव अमित देशमुख अध्यक्ष असलेल्या विलासराव देशमुख फाऊंडेशनला  दोन लाख चौरस फुटांचा प्लॉट कवडी मोल भावाने देऊन टाकला होता.  तसेच ईडी बांद्रा रेक्लेमेशनमधील  ङए 88 या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी डिजाईन केलेल्या  26 मजली टॉवरमध्ये ते म्हाडाचे अध्यक्ष असताना ज्यादा एफएस आय दिल्याबद्दल काँग्रेसने बाबा सिद्धीकी यांना दुसर्‍यांदा चौकशीसाठी बोलवले आहे. 

भ्रष्टाचाराचे असले विक्रम प्रस्थापित करणार्‍या काँग्रेसने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने व पारदर्शक पद्धतीने काम करणार्‍या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारे हीन पातळीवरील आरोप हे महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही. 

आमची मुख्यमंत्रांकडे आग्रहाची मागणी आहे की त्यांनी या घृणास्पद आरोपांकडे दुर्लक्ष न करता संजय निरुपम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे त्यांनाही माफी मागण्यास भाग पडावे   या शब्दात श्वेता शालिनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.