Fri, Jul 19, 2019 07:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्थानिक भाजप नेत्यांकडून माझ्या कामांना अपशकून

स्थानिक भाजप नेत्यांकडून माझ्या कामांना अपशकून

Published On: May 27 2018 1:31AM | Last Updated: May 27 2018 1:24AMपालघर : प्रतिनिधी

बाबांचे कार्य सुरू रहावे, यासाठी बाबांच्या स्मरणार्थ छोटेमोठे कार्यक्रम घेणे मी सुरू केले. मात्र, यामुळेही भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पोटात दुखले. त्यांनी केवळ मी कार्यक्रम लावला म्हणून फाेनाफाेनी करून माझ्या कार्याला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाबोलच श्रीनिवास यांनी आपल्या भाषणात केला.

चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पक्षाकडून थोडे प्रेम मिळावे, आपुलकी मिळावी एवढीच अपेक्षा होती. मात्र, भाजपकडून ते मिळालं नाही. यामुळे काय करावे हे समजत नसताना, अरे रडतोस काय लढायला शिक हे बाळासाहेबांचे शब्द मला आठवले. त्यामुळेच  मी शिवसेना पक्षप्रमुखांची वेळ मागितली आणि मातोश्रीवर गेलो. उद्धव ठाकरेंनी मला परिवाराप्रमाणे वागणूक दिली. मातोश्रीवर खरोखरच आई आहे, याचा अनुभव तेथे गेल्यानंतर आला, त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला असे श्रीनिवास वनगा यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

मला कोणीही पळवले नाही, मी उमेदवारीच्या अपेक्षेने नव्हे तर प्रेम, आधार मिळवण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. मात्र, जिल्ह्यातील शिवसैनिकांचे प्रेम आणि इच्छेमुळे मला शिवसेनेकडून तिकीट मिळाले, असे श्रीनिवास यांनी प्रत्येक भाषणातून सांगितले.

आज बाबा (चिंतामण वनगा) असते, तर ही सभा घेण्याची वेळच आली नसती. वडिलांनी मरेपर्यंत भाजपचे इमाने इतबारे काम करून पक्ष वाढवला. त्यांनी प्रसंगी आपल्या तब्येेतीकडे तसेच कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. दिल्लीत अधिवेशन सुरू असतानाच वनगा यांचे निधन झाले. ही दु:खद बातमी कळताच मी दिल्लीला गेलो. मी ताबडतोब दिल्लीला रवाना झालो. बाबांचे निट दर्शन घेता आले नाही, निट रडताही आले नाही, कारण मला बाबांचे शव त्वरित घरी आणायचे होते, असे वक्तव्य श्रीनिवास यांनी आपल्या भाषणातून केले.

केंद्र आणि राज्यात ज्या राष्ट्रीय पक्षाची सत्ता आहे, त्या पक्षाच्या एका लोकप्रतिनिधीचे दिल्लीत अकस्मात निधन झाले. या पक्षाचे पंतप्रधान, पक्षाध्यक्षांना बाबांचे अंतिम दर्शन घ्यायलाही वेळ नव्हता, असा भावनिक हल्ला श्रीनिवास यांनी भाजपवर चढवला. सामान्य विमान प्रवासी जसे आपले पार्सल आणतात, अशा विमानातून माझ्या वडिलांचा मृतदेह पाठवण्यात आला. विमानतळावर बाबांचे शव अक्षरशः तीन ते चार तास ताटकळत ठेवले अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.