Sun, Aug 25, 2019 03:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:17AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

मुंबईत चांगल्या ठिकाणी नोकरीला लावून देण्याचे व लग्नाचे आमिष दाखवून बांगलादेशातून आपल्या सोबत आणलेल्या 16 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला वेश्या व्यवसायात ढकलल्याची घटना कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी लियान उर्फ सौरभ नूर इस्लाम मुल्ला (20) या बांगलादेशी तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याची अत्या फरार झाली आहे. शेहग मोहमद हबीब इस्लाम (25) असे फरार झालेल्या महिलेचे नाव आहे.

बांगलादेशच्या बोरीसाल जिल्हातील मिरझागंज येथे राहणार्‍या 16 वर्षीय पीडित तरुणीला बांगलादेशातीलच नराईल येथे राहणार्‍या लियान उर्फ सौरभ नूर इस्लाम मुल्ला या तरुणाने मुंबईत नोकरी लावण्याचे व लग्नाचे आमिष दाखवले होते. सौरभच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित तरुणी त्याच्यासोबत ठाण्यात आली. यावेळी त्याने पीडित तरुणीला कळव्यात ठेवले. यादरम्यान त्या तरुणाने पीडित तरुणीवर वारंवार बलात्कार करून तीस आपली आत्या शेहग मोहमद हबीब इस्लाम हिच्या मदतीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. 

ही पीडित तरुणी कळवा विटावा येथील ब्रिज जवळ रस्त्यावर उभी राहून शरीरविक्रेय करत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या तरुणीची सुटका करून सौरभ यास अटक केली. तर शेहग मोहमद हबीब इस्लाम ही महिला फरार झाली आहे. पीडित तरुणी व आरोपी यांच्याकडे भारताचे कुठलेही वैध दस्तावेज आढळून आलेले नाहीत. त्यामुळे ते घुसखोरी करून भारतात आले असावेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर फरार महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.