होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरीचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक

नोकरीचे प्रलोभन दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक

Published On: Feb 07 2018 1:38AM | Last Updated: Feb 07 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी 

रेल्वे, महापालिका, मुंबई पोलीस दलासह विविध सरकारी नोकर्‍यांचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या एका भामट्याचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा दाखल होताच विरार येथून ललित ओमप्रकाश सावंत ऊर्फ निलेश याला सोमवारी पोलिसांनी अटक केली असून त्याने आतापर्यंत तीसहून अधिक तरुणांची सुमारे 54 लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. मुंबईसह सोलापूर, ठाणे, सांगली, रायगड आणि रत्नागिरीच्या तरुणांना गंडा घातल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले. दरम्यान, येथील लोकल कोर्टाने त्याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बोरिवली पोलीस ठाण्यात एका बेरोजगार तरुणाच्या तक्रारीवरुन या भामट्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. तक्रारदार तरुण सुशिक्षित बेरोजगार असून नोकरीच्या शोधात होता. याच दरम्यान त्याची ओळख ललित सावंतशी झाली. आपण पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त असल्याचे सांगून त्यांची रेल्वेमध्ये चांगली ओळख आहे. तिथे सहाय्यक लोको पायलटच्या काही जागा शिल्लक आहे. तिथे त्याला नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. काही दिवसांत त्याला नोकरीचे कॉललेटरसह अपॉईंटमेंट लेटर देऊन त्याने त्याचा विश्‍वास संपादन केला. नंतर त्याला मेडीकलसाठी पाठवले. या कालावधीत त्याने त्याच्याकडून पावणेसहा लाख रुपये घेतले होते. मात्र नोकरी मिळविण्यास उशीर होत असल्याने तो तरुण कंटाळून गेला. नेहमीच केवळ आश्‍वासनापलीकडे काहीच होत नसल्याने अखेर त्याने सोमवारी बोरिवली पोलिसांत तक्रार केली.

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन बोरिवली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. या गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करत होते. हा तपास सुरु असताना विरार येथील ग्लोबल सिटी परिसरातून ललित सावंतला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या कारच्या झडतीत पोलिसांना सहाय्यक पोलीस आयुक्त या पदाचा अधिकारी वापरत असलेला युनिफॉर्म, बेल्ट, कॅप, तसेच युनिफॉर्मवर पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह सापडले. त्यानंतर त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना महापालिका, पोलीस, रेल्वेसह इतर शासकीय विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेची कागदपत्रे, अनेक बेरोजगार तरुणांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतच्या फाईल्स सापडल्या. चौकशीत ललितने आतापर्यंत तीसहून अधिक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना 54 लाख रुपयांना गंडा घातल्याचे   सांगितले. 

फसवणुकीचा आकडा त्यापेक्षा जास्त असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने एका टेलरकडून पोलीस गणवेश बनवून घेतले होते. इतकेच नव्हे तर पोलीस महासंचालक चिन्हाचा गैरवापर केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस कोठडीत असलेल्या ललितची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.