Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकरीचे आमिष दाखवत वृद्धाला ७.८२ कोटींचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवत वृद्धाला ७.८२ कोटींचा गंडा

Published On: Jan 17 2018 2:01AM | Last Updated: Jan 17 2018 12:53AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

नोकरीच्या शोधात असलेल्या 62 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला यूकेमध्ये नोकरीचे आमिष दाखवत ठगांनी तब्बल 7 कोटी 82 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार चेंबुरमध्ये उघडकीस आला आहे. वृद्धाच्या तक्रारीवरुन नेहरुनगर पोलिसांनी यूकेमधील डॉ. कोडी मिशेल याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

चेंबुरच्या श्रमजीवीनगर परिसरात राहणारे 62 गोविंद दलजीत तलवार हे तीन वर्षांपूर्वी एका खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले. नोकरीच्या काळात व निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम बँकेत डिपॉझीट ठेऊन व्याजाच्या आधारे तलवार हे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र मिळणारे व्याज कमी असल्याने तलवार हे नोकरीच्या शोधात होते. त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. यूकेतील डॉ. कोडी मिशेल यांच्या राहत्या घरात खाजगी व्यवस्थापकासाठी पद खाली असून यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, असा ईमेल गेल्यावर्षी 24 सप्टेंबर रोजी तलवार यांना आला.

यूकेत नोकरी मिळत असल्याने आनंदी असलेल्या तलावर यांनी याला होकार देत सर्व कागपत्रे, फोटो आणि पासपोर्टची माहिती डॉ. मिशेल यांना पाठवली. तुमची खाजगी व्यवस्थापक पदासाठी निवड झाली असून महिन्याचे 3 लाख 32,800 रुपये वेतन आणि 64 हजार रुपये भत्ता देण्याचे डॉ. मिशेल यांनी ईमेल पाठवले. तलवार आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच ठगांनी व्हीसा प्रोसेसिंगच्या नावाखाली 3 लाख 83 हजार रुपये उकळले. तलवार यांचा विश्‍वास बसावा म्हणून ठगांनी 28 ऑक्टोबर रोजी तलवार यांना युकेचा व्हीसा ईमेल केला. यानंतर ठगांनी महेष पंडीत, अहमद हुसेन व शिवजी शहा यांच्या बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार तलवार यांनी पैसे भरलेही मात्र नोकरीसाठी कधी रवाना व्हायचे आहे, हे न सांगितल्याने त्यांना संशय आला. तलवार यांनी नोकरीबाबत विचारणा करताच, तुम्ही शेवटच्या टप्प्यात आहात आता फक्त 96 हजार रुपये भरा त्यानंतर मी टिकीट पाठवतो, असे सांगितले. आतापर्यंतचे पैसे मी कर्ज काढून दिले आहेत. त्यामुळे ही रक्कम तुम्हीच माझ्यातर्फे भरा व माझ्या वेतनातून वजा करुन घ्या, असे तलवार यांनी सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार तलवार यांच्या लक्षात आल्याचे समजताच ठगांनी संपर्क तोडला. अखेर तलवार यांनी आतापर्यंत भरलेले 7 कोटी 82 लाख 500 रुपये परत मागण्यास सुरूवात केली. मात्र समोरून काहीच उत्तर येत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमवारी सायंकाळी तलवार यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.