मुंबई : पुढारी ऑनलाईन
मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर दक्षिण मुंबईत झालेल्या एका रॅलीत चप्पल फेकण्यात आले. नागपाडा येथे मंगळवारी झालेल्या एका रॅलीत हा प्रकार घडला. ओवैसी यांना चप्पल लागले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
रॅलीत ज्या व्यक्तीने ओवैसी यांच्यावर चप्पल फेकले त्याची ओळख पटली आहे. संबंधीत व्यक्तीचा शोध सुरू असून त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास ओवैसी यांचे तीन तलाक या मुद्दयावर भाषण सुरु होते. तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्या दिशेने चप्पल फेकले.
लोकशाहीने मला दिलेल्या आधिकारासाठी मी काहीही करण्यास तयार आहे. तीन तलाक संदर्भात सरकारने जो निर्णय घेतला आहे. तो मुस्लिम समाजाला मान्य नाही. त्यामुळे काही लोक निराश झाल्याचे ओवैसी यांनी सांगितले. ज्यांनी माझ्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला, ते महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या विचारधारेशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.