Wed, Jul 17, 2019 08:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकाच्या निविदेवर वाटाघाटीसाठी समिती 

शिवस्मारकाच्या निविदेवर वाटाघाटीसाठी समिती 

Published On: Feb 03 2018 2:43AM | Last Updated: Feb 03 2018 2:34AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीची निविदा अपेक्षित खर्चापेक्षा बरीच जास्त असून त्यावर वाटाघाटी करण्यासाठी मुख्य सचिव सुमित मलिक यांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खर्च कमी करण्यासाठी स्मारकाचे क्षेत्रफळही कमी करण्यात येणार असल्याचे समजते. शिवस्मारकाचा आराखडा सुरुवातीला 17 हेक्टर क्षेत्रावर करण्यात आला होता. मात्र, नंतर 10 हेक्टर जागेवर स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता एकूण 7 हेक्टर जागेवरच स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचा खर्च कमी करण्यासाठी स्मारकाचे क्षेत्रफळ कमी करण्यात आल्याचे समजते.  स्मारकासाठी 2500 कोटींचा खर्च अंदाजित केला असताना लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीने 3600 कोटींची निविदा सादर केली आहे. अन्य कंपन्यांपेक्षा ही सर्वात कमी किमतीची निविदा आहे. निविदा आल्यानंतर 10 महिने झाले तरी त्यावर कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र, आता या निविदेवर वाटाघाटी करुन किंमत कमी करण्यासाठी मुख्य सचिवांची समिती नेमली आहे. या समितीत वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष सिंग आदींचा समावेश आहे.