Wed, Mar 20, 2019 08:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शिवशाही’चा प्रवास जीवघेणा ! 

‘शिवशाही’चा प्रवास जीवघेणा ! 

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:34AMमुंबई : संजय गडदे

एसटी महामंडळाने गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या शिवशाही बससेवेला अपघातांचे ग्रहण लागले आहे. राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत शिवशाहीचे लहान-मोठे असे 25 पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. यामध्ये बस उलटण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. या अपघातांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. शिवाय अनेकांना अपंगत्व देखील आले. प्रशिक्षणाचा अभाव असणारे चालक अपघातास जबाबदार असल्याची चर्चा महामंडळात सुरू आहे. 

खासगी बसवाहतुकदारांशी स्पर्धा करण्यासाठी एसटीने वातानुकूलित, स्वस्तदरात, आरामदायी सेवा प्रवाशांना देण्यासाठी शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मार्गावर या बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यातही आल्या. महत्त्वाच्या मार्गांवर शिवशाही बस चालवण्यात येत असून त्यास प्रतिसादही चांगला आहे. मात्र मागील तीन महिन्यांच्या काळात चांगल्या सुविधांसाठी नव्हे, तर शिवशाही बसेसना झालेल्या अपघातांमुळे शिवशाही बस अधिक चर्चेत आल्या. त्यामुळे या बसच्या तांत्रिक बांधणीबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. 

या बसलाच होत असलेल्या अपघातांमुळे एसटी महामंडळासह परिवहन विभाग आणि प्रवाशांमध्ये यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. एसटीच्या चालकांच्या बस चालवण्याबाबत आक्षेप घेण्यात येत असून, शिवशाहीमध्ये तांत्रिक दोष असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली आहे. खासगी कंपनीच्या जुन्या ट्रॅव्हल्स गाड्या शिवशाही ताफ्यात दाखल झाल्या असून सातत्याने होणार्‍या अपघातांमुळे या बसविषयी शंका निर्माण केली जात आहे. त्यामुळे या बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळात एकूण 897 शिवशाही बस असून त्यापैकी स्वत:च्या मालकीच्या 479 आणि कंत्राटी स्तरावर 418 बस आहेत. या बसचे तिकीट इतर सेवांच्या मानाने स्वस्त असल्याने या सेवांना चांगला प्रतिसाद आहे. कंत्राटी स्तरावर बसचा चालक हा कंत्राटदाराचा असून कंडक्टर महामंडळाच्या सेवेतील आहे. या बस चालवणारे चालक हे खासगी कंपनीचे असल्याने त्यावर एसटीचे नियंत्रण राहिले नाही. पण या चालकांना योग्य प्रशिक्षण व पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचाही दावा केला जातो. त्यासाठी कंत्राटदार जबाबदार असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. 

शिवशाही बस की पांढरा हत्ती? 

शिवाय शिवशाही बससाठी एसटीतर्फे वाहक व डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. उदा. श्रीरामपूर-पुणे या मार्गावर 378 कि.मी. अंतरास 100 लीटर डिझेल दिले जाते. या खासगी कंपनीला 18 रुपये 1 कि.मी. अंतरास भाडे दिले जाते. बसचे उत्पन्न कमी आले तरी 18 रुपयांप्रमाणे भाडे देण्याचे एसटीला बंधन आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु झालेली ही बस ही शिवशाही बस आहे की पोसलेला पांढरा हत्ती असा प्रश्‍नच या निमित्ताने निर्माण झाला आहे.  

शिवशाहीविषयी प्रवाशांच्या तक्रारीत वाढ

शिवशाही एसटी बसचा आरामदायी प्रवास डोकेदुखी निर्माण करणारा होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. एसटी खात्याने मोठ्या प्रमाणावर खासगी कंपनीच्या शिवशाही बसेस सर्वत्र सुरू केल्या आहेत. या बसेसमुळे प्रवास आरामदायी होईल असे वाटत होते. परंतु, तो भ्रमनिरास झाला आहे. बसेस वेळेवर न सुटणे, नियोजित ठिकाणी लालपरी बसपेक्षाही उशिरा पोहोचणे यामुळे डोकेदुखी ठरत असल्याने भरमसाट भाडे देऊन देखील प्रवाशांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे.