Thu, Jun 20, 2019 01:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्नसराईसाठी सज्ज झाली 'शिवशाही'

लग्नसराईसाठी सज्ज झाली 'शिवशाही'

Published On: Dec 08 2017 2:33PM | Last Updated: Dec 08 2017 2:33PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्‍ट्र परिवहन आणि खारभूमी विकास मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून साकारलेली एसटीची 'शिवशाही' ही बस प्रवाशांच्या अभूतपूर्व स्वागतानंतर लग्न समारंभ, साखरपुडा, बारसे अशा अनेक आनंददायी सोहळ्यामध्ये सन्मानाने मिरविण्यासाठी सज्ज झाली आहे. रावते यांच्या निर्देशानुसार आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्य अशी संपूर्ण वातानुकूलित 'शिवशाही' ही राज्य परिवहन बस सर्वसामान्यांना  ५४ रूपये प्रती किमी इतक्या माफक दरात प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक नुकतेच एसटी प्रशासनाने सर्व आगारांना पाठवून दिले आहे.  

लग्न समारंभ म्हटलं की, वर्हाडी मंडळींना घेऊन जाणारी 'एसटी' हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होते. कालांतराने लग्नाचे जसे 'बजेट' वाढले तसे वर्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी चांगल्या आरामदायी बसेसची मागणी होऊ लागली. अर्थात यामुळेच एसटीच्या नेहमीच्या परिवर्तन बसकडे अनेक वर्हाडी मंडळींनी पाठ फिरविली. शिवशाही बसचे आगमन होताच अनेकांनी या बसेस लग्नसराईसाठी प्रासंगिक करारावर देण्याबाबत महामंडळाकडे विचारणा सुरु केली . यंदाचा लग्नाचा 'सिझन' नुकताच सुरु झाल्यामुळे तो 'कॅश' करण्याच्या हेतूने राज्य परिवहन महामंडळाने ८ डिसेंबर पासून शिवशाही हर ४५ आसनी बस ५४ रूपये प्रति कि.मी. दराने प्रासंगिक करारावर देण्याचे ठरविले आहे.

याबाबतचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून, दिवसाला किमान ३५० कि.मी.चे भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार ही बस भाड्याने घेता येईल. याच बरोबर धार्मिक यात्रा, सहल व इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या लोकांसाठीही बस प्रासंगिक करारावर उपलब्ध होणार असून, सध्या ज्या आगाराकडे या बसेस उपलब्ध आहेत, त्या आगारात याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल. असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.