Sun, May 19, 2019 22:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचा स्वबळाचाच नारा!

शिवसेनेचा स्वबळाचाच नारा!

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:57AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेने महाआघाडीत सहभागी झाल्यास भाजपाचा पाडाव होईल, असे वक्तव्य केले असले तरी शिवसेनेने आपला स्वबळाचा नारा तूर्तास तरी कायम ठेवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत बहुमत नसतानाही नरेंद्र दराडे आणि विप्लव बजोरीया हे आपले उमेदवार जिंकल्यामुळे शिवसेना यापुढेही स्वबळावर निवडणुका लढविल, असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील रंगशारदा येथे मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील शिवसेना उमेदवारांच्या रणनीतीसाठी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. उद्धव म्हणाले, दराडे यांच्याकडे 250 मते होती तर विप्लव बाजोरीया यांच्याकडे 97 मते होती. इतर उमेदवारांकडे असलेल्या मतांच्या तुलनेने हे दोन्ही उमेदवार जिंकण्याची शक्यता नव्हती. पण शिवसैनिकांना परिश्रम घेतल्यामुळे विजयश्री आपल्याकडे आली. त्यामुळे शिवसैनिकांच्या बळावर यापुढेही सर्वच निवडणुका स्वबळावर लढु. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीतील काही मुद्दे उद्धव ठाकरे सांगतील, असे शिवसैनिकांना वाटत होते. परंतु उद्धव यांनी आपल्या भाषणात शहा यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली,  एवढेच सांगितले.  आदित्य ठाकरे यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी करण्याच्या सूचना उपस्थितांना दिल्या. दरम्यान, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील सेनेला विश्‍वासात न घेता महामंडळ अध्यक्ष पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. यापुढील कुठल्याच महामंडळांवर शिवसेना नियुक्त्या करणार नाही, अशा शब्दात सेनेचे सचिव अनिल देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे.