Tue, Mar 19, 2019 05:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेची गच्चीवरील पार्टी पुन्हा अडचणीत

शिवसेनेची गच्चीवरील पार्टी पुन्हा अडचणीत

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी 

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीच्या धोरणाची पालिका आयुक्तांनी परस्पर अंमलबजावणी सुरू केल्यामुळे शिवसेना युवराजांची इच्छा पूर्ण झाली खरी पण आता पालिका आयुक्तांनी परस्पर घेतलेल्या या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहाच्या विशेष बैठकीची मागणी केली आहे.

हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीचे धोरण निश्‍चित करण्याचा आग्रह गेल्या चार वर्षापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी लावून धरला होता. पण सुधार समितीसह पालिका सभागृहात भाजपासह काँग्रेसने तो रोखून धरला. गच्चीवरील पार्टीच्या धोरणाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परस्पर मंजुरी दिल्यामुळे युवराजांचे स्वप्न साकार झाले. पालिका सभागृहात धोरणाचा प्रस्ताव प्रलंबित असताना, आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. अधिकृत वापरण्याजोगा चटईक्षेत्र निर्देशांक शिल्लक नसलेल्या व गच्चीवरील मोकळी जागा चटईक्षेत्र निर्देशांकात न पकडलेल्या गच्चीवर पालिका आयुक्त पार्टी करण्यास कशी काय परवानगी देऊ शकतात, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिकेचे कामकाज महापालिका सभागृह व विविध समित्यांच्या मार्फत पार पडते. नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या बाबींसंबंधातील धोरणात्मक निर्णय सभागृहात चर्चा करून घेण्यात येतात. सभागृहाने मंजूर केलेल्या कामकाजाची अंमलबजाणी करण्याचे काम आयुक्तांचे असते, याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी करून दिली आहे.