होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘चाणक्य म्हणाला होता, ..तर नाते निभवायचे नसते’

‘चाणक्य म्हणाला होता, ..तर नाते निभवायचे नसते’

Published On: Jul 15 2018 10:14AM | Last Updated: Jul 15 2018 10:15AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशात २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वारे आतापासूनच जोरदार वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. तेव्हा अमित शहा यांनी पक्षाची ‘सोशलवारी’ सुपरफास्ट निघल्याचे सूचित करून इतर पक्षांसमोर ‘सोशल आव्हान’ उभे केले. अमित शहांना भाजपचे ‘चाणक्य’ असे म्हटले जाते. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन चाणक्य असेही म्हणाला होता म्हणत एक पोस्ट केली आहे. यातून पुन्हा भाजपसोबत युती होणार नसल्याचेच संकेत दिले आहेत.

संजय राऊत यांनी ट्विटरवर ‘चाणक्य असेही म्हणाला होता’ असे कॅप्शन देत एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, नाते तोडू नये पण ज्या ठिकाणी नात्यांची किंमत ठेवली जात नाही तिथे ती निभावण्याची गरज नाही. यामध्ये त्यांनी भाजपकडून युतीबाबात होणाऱ्या चर्चा आणि अमित शहांवर नाव न घेता टीका केली आहे. 

केंद्रासह राज्यातही शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे असताना महाराष्ट्रात शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी भाजपला जास्त जागा मिळाल्याने निकालानंतर शिवसेनेने नमते घेत भाजपला पाठिंबा दिला. आता भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. पालघर पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंनी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे म्हटले होते. त्यातून भाजपशी पुन्हा हात न मिळवता शिवसेना वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे. 

लोकसभेच्या दृष्टीने आतापासूनच राजकीय वातावरण तयार करण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. प्रत्येक पक्षाने आगामी निवडणुकीत मतांची रास आपल्याकडे ओढण्यासाठी विविध फंडे, फॉर्म्युले शोधण्यास सुरुवात केली आहे. संसदीय निवडणुकांच्या राजकारणासाठी लागणारी लोकशाही आयुधे पक्षांनी पेरायला सुरुवात केली. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होईल. अलीकडच्या काळात सोशल मीडियाचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्याचाच वापर करुन विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.