Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता स्टेशनवर रेल बाजार !

आता स्टेशनवर रेल बाजार !

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी 

रेल्वे स्टेशनलगतच्या फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी मुंबईतील प्रमुख स्टेशनमध्ये रेल बाजार सुरू करण्याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने पालिका सभागृहाच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी देऊन तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

मुंबईतील दादरसह बांद्रा, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड आदी प्रमुख स्टेशनसह अन्य स्टेशन परिसरात फेरीवाल्यांचा वावर वाढला आहे. पालिकेने स्टेशनपासून दिडशे मिटर अंतर फेरीवाला मुक्त केले आहे. पण आजही अनेक स्टेशन परिसरात फेरीवाले दिसून येते आहेत. फेरीवाला धोरणावरून फेरीवला व पालिकेत असलेले मतभेद लक्षात घेता, फेरीवाला धोरणाचा तिढा सूटणे अशक्य आहे. त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शिवसेनेने रेल बाजार ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी आग्रह धरला आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेने प्रवास करणारा बहुतांश प्रवासी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे बाजारात जाऊन भाजी व अन्य वस्त खरेदीला वेळच मिळत नाही. त्यामुळे सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर उपनगरीय रेल्वे स्टेशनवर रेल बाजार सुरू करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी केली आहे. 

स्टेशन परिसरातील फेरीवाला ग्राहक नसल्यामुळे स्वत:हून आपला फेरीचा व्यवसाय बंद करेल,  असे मत पाटणकर यांनी व्यक्त केले. याबाबतची ठरावाची सूचना पाटणकर यांनी पालिका सभागृहाच्या मंजूरीसाठी ठेवली आहे. जून महिन्यात होणार्‍या सभागृहात या प्रस्तावाला मंजूरी देऊन तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.