Tue, Apr 23, 2019 18:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चुकीचा विकास आराखडा मुंबईकरांवर लादण्याचा घाट!

चुकीचा विकास आराखडा मुंबईकरांवर लादण्याचा घाट!

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 14 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या 2034 च्या विकास आराखड्यात नगरसेवकांची मते विचारात घेण्यात आलेली नाहीत. एवढेच नाही तर पालिका आयुक्तांना जादा अधिकार देऊन, लोकप्रतिनिधींना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. या आराखड्यात राज्य सरकारचा सर्वाधिक हस्तक्षेप असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. असा चुकीचा आराखडा मुंबईकरांवर लादला जात असल्याचा आरोप करत, शिवसेनेने हा आराखडा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आराखडा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईच्या 2014-34 च्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे याची येत्या 23 जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. पण या आराखड्यातील चुका दुरूस्त करण्यासाठी नगरसेवकांनी दिलेल्या हरकती व सूचनांचा विचारच करण्यात आलेला नाही. एवढेच नाही तर, शासनाने मुंबईकरांच्या हरकती व सूचना समजून घेण्यासाठी नेमलेल्या लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या नियोजन समितीच्या शिफारशीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुंबईकरांसह नगरसेवकांनी सुचवलेल्या अवघ्या 266 पैकी 138 सूचनांचा आराखड्यात विचार करण्यात आला आहे. पालिका आयुक्तांना आरक्षणात बदल करण्यासह मुंबईतील हद्दी बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

परवडणार्‍या घराबाबतही अद्याप स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे असा चुकीचा आराखडा येणार्‍या काळात मुंबई शहराला घातक असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. चुकीचा आराखडा मुंबईकरांवर लादण्यापेक्षा त्यात मुंबईकरांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार व्हायलाच हवा. अन्यथा हा आराखडा रद्द करण्यात यावा, अशी मागणी जाधव यांनी केली. त्यामुळे अंतिम टप्प्यात विकास आराखड्याच्या मंजुरीला लगाम लागण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.