Fri, Mar 22, 2019 05:58
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  खडसे कर्माची फळे भोगत आहेत : शिवसेेनेची टीका

 खडसे कर्माची फळे भोगत आहेत : शिवसेेनेची टीका

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:29AMमुंबई : खास प्रतिनिधी

ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सध्या आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत पक्ष सोडायला भाग पाडू नका, अशी धमकी नेतृत्वालाच दिल्यानंतर भाजपने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता शिवसेना विरुद्ध खडसे असा वेगळाच सामना रंगला आहे. खडसे यांना याच जन्मातील कर्माचे फळ भोगावे लागत असल्याची जहरी टीका करून मागच्या निवडणुकीत युती तोडण्याचा आग्रह धरणार्‍या खडसेंचा बदला शिवसेनेने घेतला आहे. त्यावर शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी आणि मग भाजपच्या नेत्यांवर टीका करावी, असा प्रतिहल्ला खडसे यांनी चढवला आहे.

जमीन गैरव्यवहाराचा आरोप झाल्यानेे मंत्रिपद गमवावे लागलेले एकनाथ खडसे सध्या आपली नाराजी उघडपणे व्यक्‍त करू लागले आहेत. थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून ही नाराजी व्यक्‍त करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. आपल्याला पक्ष सोडण्याची इच्छा नसताना त्यासाठी मजबूर करू नका, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्यांना खुलेआम आपल्याकडे येण्याची ऑफर दिली होती.

आता भाजप विरुद्ध खडसे असे युद्ध होणार, असे चित्र असताना अचानक शिवसेनेने खडसेंवर टीकेचे प्रहार केले आहेत. आजच्या ‘सामना’तील अग्रलेखातून एकनाथ खडसे यांच्यावर जहरी टीका केली गेली आहे. एकनाथ खडसे यांना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून खुली ऑफर असली, तरी पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच, या जन्मातले कर्माचे फळ याच जन्मात फेडावे लागते, अशा तिखट शब्दांत शिवसेनेने नाथाभाऊंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आज खडसे यांनी शिवसेनेवर प्रतिहल्ला चढवत शिवसेनेच्या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही. 

शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे, मग आमच्यावर टीका करावी, असे म्हटले आहे. सेनेत सत्ता सोडण्याची हिंमत नाही, ते सत्तेत राहूनच भाजपवर टीका करत राहतील, असा टोमणादेखील खडसेंनी मारला आहे.