Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेने राखला सायनचा गड!

शिवसेनेने राखला सायनचा गड!

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी 

काँग्रेसने प्रचारात घेतलेली आघाडी व मतदारांचा काँग्रेसकडे असलेला ओढा लक्षात घेता, शिवसेना सायन प्रतिक्षा नगरचा गड गमावणार असे वाटत होते. पण शिवसेनेला पुन्हा एकदा हा गड राखण्यात यश मिळाले आहे. पालिका पोटनिवडणूकीत येथून शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे अवघ्या 845 मतांनी निवडून आले आहेत.

सायन प्रतिक्षा नगर प्रभाग क्रमांक 173 चे शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्यामुळे या प्रभागात शुक्रवारी पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी सुरू झाल्यानंतर शिवसेना उमेदवार रामदास कांबळे व काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेट्ये यांच्यात चुरस लागली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत चौथ्या स्थानावर फेकला गेलेल काँग्रेस उमेदवार जेमतेम 2 हजार मते घेईल असे वाटत होते. पण काँग्रेस उमेदवार सुनिल शेट्ये यांनी या प्रभागात मुसंडी मारत तब्बल 5 हजार 771 मते घेतली. तर शिवसेनेच्या रामदास कांबळे यांना 6 हजार 616 मते मिळाली. अपक्ष उमेदवार गौतम झेंडे यांनी अवघी 549 मते घेतली. तर 234 मतदारांनी कोणत्याच पक्षाला मते दिली नाहीत. 

काँग्रेसच्या या मुसंडीमुळे सत्ताधारी शिवसेनेची झोप उडाली आहे. 173 मध्ये शिवसेनाच निवडणूक जिंकणार असा दावा विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी केला होता. त्यामुळे सायन भागातील शिवसैनिक कामाला लागले होते. पण शिवसेनेला स्वत:चा करिष्मा दाखवता आला नाही. या विजयामुळे पालिकेतील शिवसेनेची संख्या जैसेथे राहिली असून काँग्रेसला आपले संख्याबळ वाढवण्याची संधी गमवावी लागली आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Shivsena, candidate elected, Municipality bye election,