Tue, Sep 25, 2018 04:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘खडसेंना मंत्रीमंडळात घ्यावे लागेल, अन्यथा...’

‘गडगडाट! मुख्यमंत्र्यांना फाजील लाड भोवले’

Published On: Jul 04 2018 10:02AM | Last Updated: Jul 04 2018 11:10AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. सरकारसमोर भूखंड प्रकरणाच्या आरोपाला उत्तर देण्याचे आव्हान असणार आहे. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या मुद्दयावरुन काल घेरले आहे. यातच आता सत्तेत सोबत असलेल्या शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांना फाजील लाड भोवले असल्याचे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली. 

सिडको भूखंड घोटाळा भाजपला स्वस्थ बसू देणार नाही असेही शिवसेनेने म्हटले आहे. काँग्रेसने आतापर्यंत असंख्य घोटाळे केले. घोटाळ्याचा प्रत्येक आरोप काँग्रेसने नाकारला. मुख्यमंत्र्यांनीही सिडको भूखंड घोटाळ्याचा आरोप नाकारला. हताश काँग्रेसचा हा पोरकटपणा असल्याचे त्यांनी सांगितले, पण फाजील ‘लाड’ मुख्यमंत्र्यांना भोवले हे कागदपत्रे सांगत आहेत. खडसे यांना एका भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनी घरी बसवले. कारण स्वच्छ पारदर्शक कारभाराचे ते भोक्ते आहेत. आता खडसे यांना मंत्रिमंडळात घ्यावे लागेल, नाहीतर मुख्यमंत्र्यांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल असा टोलाही पारदशर्क कारभारावरुन मुख्यमंत्र्यांना लागावला आहे.

सध्या राज्यात अनेक प्रश्न समोर असताना सिडकोच्या भूखंडाचे व्यवहार इतक्या वेगाने कसे झाले? लोककल्याणाकारी राज्यात कधी काय घडेल सांगता येत नाही असेही शिवसेनेने म्हटले आहे. 

पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी भूखंड घोटाळ्यावरुन टीका करण्यात आली. तसेच सरकारच्या पाठीशी शिवसेनारुपी सावित्री असल्याचाही टोला विरोधकांनी लगावला. सिडको भूखंड घोटाळ्याच्या आरोपांना सभागृहात उत्तरे देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता सभागृहात कोणाची भूमिका काय असेल? आणि मुख्यमंत्री काय उत्तरे देणार याकडे लक्ष लागले आहे.