Tue, Apr 23, 2019 06:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मोदी संपर्काबाहेर, नेटवर्कसाठी शहांची देशभ्रमंती'

'मोदी संपर्काबाहेर, नेटवर्कसाठी शहांची देशभ्रमंती'

Published On: Jun 06 2018 11:03AM | Last Updated: Jun 06 2018 10:51AMमुंबई  : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना याबाबत सूचनाही दिल्या. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २०१९ च्या निवडणुकीसाठी एनडीएची मोट बांधण्याच्या हेतूने घटक पक्षासोबतचे मतभेद दूर करण्याची कसरत करत आहेत. ते आज मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या भेटीपूर्वी शिवसेनेने आपल्या मुखपृष्ठ असलेल्या 'सामना'तून परदेशी दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. तर शहांच्या देशभ्रमंतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भारतीय जनता पक्षाने पोटनिवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत, असा उल्लेख 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. पोटनिवडणुकीत धुळधाण झाल्यानंतर भाजपला घटक पक्षांची आठवण झाली आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. २०१९ ची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेल. शिवसेनेला कोणाचीही गरज नाही, अशी भूमिका देखील सेनेने अग्रलेखातून मांडली आहे. 

पालघरची पोट निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने स्व. चिंतामण वनगांच्या नावाने मते मागितली. या निवडणुकीत शहा आणि मोदींचे फोटो पोस्टरवरुन गायब झाले होते. 'काँग्रेसचे गावित' जिंकल्यानंतर पुन्हा शहा-मोदींचे पोस्टरबाजी करत भाजपने जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. पालघरच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्याविरोधात भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती.