Fri, Mar 22, 2019 06:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'थप्पड की गुंज' विसरणार नाहीत, शिवसेनेची भाजपला चपराक

'थप्पड की गुंज' विसरणार नाहीत, शिवसेनेची भाजपला चपराक

Published On: Mar 13 2018 7:50AM | Last Updated: Mar 13 2018 7:57AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

किसान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा तोफ डागली. शेतकऱ्यांनी राजधानीत येऊन दिलेली 'थप्पड की गुंज' सरकारच्या कायम लक्षात राहिल, अशा शब्दांत शिवसेनेने मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला चपराक लगावली आहे. नाशिक ते मुंबई हा शेतकऱ्यांचा लाँगमार्चला मिळालेले यश दुरोगामी  असल्याचा उल्लेख शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या सा अग्रलेखातून करण्यात आला आहे. सरकार आता बळीराजाच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याचे धाडस करणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. शेतकऱ्यांनी तुम्हाला शेवटची संधी दिली असून लेखी आश्वासन तरी पाळा, असा सल्लाही शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

मुंबईत दाखल झालेला किसान मोर्चा म्हणजे वादळ होते. या वादळाच्या तडाख्यात सरकारचा पालापाचोळा उडून जाईल, या भीतीमुळे शेतकऱ्यांना लेखी आश्वासन मिळाले. सरकारसमोर दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्याची  मागणी सर्वप्रथम शिवसेनेनेच केली होती. यावेळी सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, ‘अटी व शर्तीं’मुळे ही कर्जमाफी फोल ठरली. ही चूक पुन्हा केली तर शेवटची संधी शेवटची काडी ठरेल, असेही  शिवसेनेने सत्ताधारी भाजपला बजावले आहे. 

शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी, आदिवासींना वनजमिनीचे पट्टे आदी प्रमुख मागण्यांसाठी नाशिक येथून मुंबईवर येऊन धडकलेल्या लाल वादळापुढे अखेर सोमवारी सरकार नमले. अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत विधान भवनात साडेतीन तास झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या सर्वच मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली होती.