Tue, Mar 19, 2019 11:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फक्त मुंबईतच कशाला, राज्यभर मालमत्ता करमाफी द्या : उद्धव

फक्त मुंबईतच कशाला, राज्यभर मालमत्ता करमाफी द्या : उद्धव

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 12:58AMमुंबई : खास प्रतिनिधी 

मुंबई महापालिका क्षेत्रातील 700 चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून माफी देण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविण्यामागे  मुंबई महापालिकेची आर्थिक कोंडी होणार आहे. शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही चाल खेळल्याचे बोलले  जात असतानाच आता शिवसेनेने राज्यातील सर्वच महापालिका क्षेेत्रातील 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातून सूट द्यावी अशी मागणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मालमत्ता कर हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नाचा प्रमुख घटक मानला जातो. जकात बंद झाल्याने आधीच पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यात आता मालमत्ताकरातही सूट दिली गेल्यास विकासकामांसाठी निधीच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेची कोंडी होणार आहे. मात्र, आता उध्दव ठाकरे यांनी मुंबईच कशाला, राज्यात सगळ्याच महापालिकांमध्ये ही योजना राबवा, अशी मागणी करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. 

मुंबईच्या विकासावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या विकास आराखड्यास मार्चअखेर मान्यता दिली जाईल, असे सांगितले होते. कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याची घोषणाही केली होती.  मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर काँग्रेसने प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले आहे.