मुंबई : प्रतिनिधी
मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांसह शिवसेनेने मुंबई महापालिका सभागृहात शक्तीप्रदर्शन केले. नव्याने शिवसेनेत आलेल्या सहा जणांसह इतर नगरसेवकांनी भगवा फेटा घालून आज (गुरूवार १५ फेब्रुवारी) सभागृहात प्रवेश केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. ‘आवाज कुणाचा.. शिवसेनेचा’, ‘कोण आला रे कोण आला.. शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत, पालिका सभागृह आजूबाजूचा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.
कुर्ल्याचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांच्यासह हर्षला मोरे, अर्चना भालेराव, दत्ता नरवणकर, परमेश्वर कदम व अश्र्वीनी माटेगावकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. पण या प्रवेशाला आक्षेप घेत मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली. गेल्या तीन महिन्यापासून या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यामुळे मनसे नगरसेवकांचे पद धोक्यात होते.
नगरसेवकांच्या मनसेतून शिवसेना प्रवेशाला कोकण आयुक्तांनी मंजूरी दिल्यानंतर याची अधिकृत घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. अखेर या सहा नगरसेवकांनी पालिका सभागृहात अधिकॄत प्रवेश केला. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांचे संख्याबळ आता ९३ झाले आहे.