Tue, Jul 16, 2019 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या! शिवसेनेची मागणी फेटाळली

रेल्वेत मराठी विद्यार्थ्यांना प्राधान्य द्या! शिवसेनेची मागणी फेटाळली

Published On: Mar 20 2018 7:44PM | Last Updated: Mar 20 2018 7:22PM नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना रेल्वेत नोकरी मिळालीच पाहिजे, अशी मागणी करत शेकडो विद्यार्थी मंगळवारी सकाळी दादर- माटुंगादरम्यान रेल्वे रुळावर उतरले. या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. राज्य निहायभरती प्रक्रिया करावी, महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेत मराठी मुलांना अगोदर सामावून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत,  शिंदे, श्रीरंग बारणे आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पियुष गोयल यांनी स्वीकारले असले तरी त्यांची मागणी साफ नाकारली आहे. देशभरातून विद्यार्थी येत असल्याचे सांगत गोयल यांनी शिवसेनेच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याचे समजते. यापूर्वी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर देखील शिवसेनेने अशा प्रकारचे निवेदन दिले होते. मात्र, त्यावेळी देखील शिवसेनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सत्तेत असून शिवसेनेच्या मागणीवर भाजप मंत्री फारसे विचार करत नसल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्यात आता रेल्वे भरती राज्यनिहाय करावी या मागणीचा समावेश झाला आहे. रेल्वे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल. रेल्वे भरती पक्षःपातीपणा होणार नाही, यासाठी योग्य काळजी घेण्यात येईल. अप्रेंटीस प्रशिक्षणार्थ्यांना २० टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय प्रशिक्षक अवधीच्या प्रमाणात वयात सुट दिली जाईल, असे ट्विटही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.

दरम्यान, आज सकाळी रेल्वे भरतीतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्थानकादरम्यान  तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन केले. रेल्वे अधिकारीवर्गाबरोबर चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर रेल्वे वाहतुक हळू पूर्वपदावर येऊ लागली. सकाळी ऐन गर्दीवेळी आंदोलन करण्यात आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी कामावर जाणार्‍या नोकरदार वर्गाचे यामुळे हाल झाले.या आंदोलनाचा परिणाम मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांवर झाला.

Tags : Minister of Railways of India, Railway Minister, Piyush Goyal, Shivsena MP, Mumbai,Thane, Unemployment Protest