Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवाजी पार्कचे साडेसात हजार टेलिफोन मेट्रो कामामुळे बंद

शिवाजी पार्कचे साडेसात हजार टेलिफोन मेट्रो कामामुळे बंद

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी 

दादर, माहीम, शिवाजी पार्क, प्रभादेवी अशा परिसरातील महानगर टेलिफोन निगमचे किमान सात ते साडेसात हजार टेलिफोन बंद पडले आहेत. मेट्रोच्या कामामुळे भूमिगत कामे करताना टेलिफोनच्या केबल्स उखडून टाकल्याने टेलिफोन सेवा बंद पडली आहे. आधीच वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना टेलिफोनही बंद झाल्याने येथील रहिवासी आणखीनच त्रस्त झाले आहेत. 

दादरच्या गोखले रोड परिसरामध्ये सध्या मेट्रो-3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या भागामध्ये शिवाजी पार्क टेलिफोन एक्स्चेंज आहे. सुजाता व सचिन हॉटेलच्या भागात जमिनीखाली महानगर टेलिफोन एक्स्चेंजच्या केबलचा मुख्य बॉक्स आहे. या बॉक्समधून या केबल शिवाजी पार्क आणि आसपासच्या परिसरात फिरवण्यात आल्या आहेत. मेट्रोचा टनेल खणताना टेलिफोनच्या केबल उखडल्या गेल्या आणि सात ते साडेसात हजार टेलिफोन लाईन बंद पडल्या असल्याचे टेलिफोन निगमच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून, बंद फोनचे प्रमाण वाढतच चालले आहे. पूर्वी मुसळधार पावसामुळे टेलिफोन सेवा बंद पडत होती, पण आता हे प्रमाण कमी झाले आहे. मात्र मेट्रोच्या कामांचा मोठा फटका टेलिफोनच्या सेवेला बसला आहे. टेलिफोन खात्यामध्ये आधीच कर्मचारी कमी असल्यामुळे टेलिफोन सेवा दुरुस्त होण्यात विलंब होत आहे.