Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवस्मारकाच्या उंचीवरून खडाजंगी

शिवस्मारकाच्या उंचीवरून खडाजंगी

Published On: Mar 08 2018 1:48AM | Last Updated: Mar 08 2018 1:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या उंचीवरून विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटरवरून 126 मीटरपर्यंत कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या भाजपचे पुतळ्याची उंची कमी करण्याचे धाडस होतेच कसे, असा सवालही विरोधकांनी केला. 

विरोधकांनी यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत सभागृहात गदारोळ केल्याने दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी केली नसून, 210 मीटरच राहणार असल्याचे स्पष्ट केले.  

विधानसभेत प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उचलून धरला. स्मारकाच्या निविदेत महाराजांच्या पुतळ्याची उंची 160 मीटरवरून 126 मीटर करण्यात आल्याचे समजते. हे  महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करण्यासारखे आहे. पहिल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असताना पुन्हा प्रस्ताव बदलण्याची गरज का भासली, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.   

छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय हा गंभीर विषय आहे. सरकारने असंवेदनशीलता दाखवत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, अशी नाराजी विखे-पाटील यांनी व्यक्‍त केली. स्मारकाच्या रचनेत बदल केल्याने पुन्हा नवी मंजुरी घ्यावी लागणार आहे. मात्र, पर्यावरण विभागाकडून नवी मान्यता मिळू न शकल्याने हे काम सुरू करता येत नसल्याने स्मारकाचे काम रखडले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जगातले सर्वात उंच स्मारक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हायला हवे आहे. ते कमी करण्याचा प्रयत्न झाला, असा संताप अजित पवार यांनी व्यक्‍त केला.

त्यावर निवेदन करताना सुधीर मुनगंटीवर म्हणाले, छत्रपतींचा पुतळा 210 मीटर उंचीचा असेल. 2001 साली महाराजांच्या स्मारकाचा निर्णय झाला, मात्र स्मारकाचे काम सुरू व्हायला 2018 उजाडले. हिंमत असेल तर चर्चा करा. गेल्या पंधरा वर्षांत तुम्ही काय केले, याची चर्चा करू. आम्ही चर्चेला तयार आहोत.