होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साई जन्मस्थळ वाद; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाथरीकर मुंबईत दाखल

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाथरीकर मुंबईत दाखल

Last Updated: Jan 22 2020 10:09AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असून, याविषयी निर्माण झालेल्या वादाची तड लागावी म्हणून शासनाने समिती नेमावी, अशी मागणी करणारा ठराव पाथरीत मंगळवारी झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पाथरीचे शिष्टमंडळ आज बुधवारी मुंबईत दाखल झाले. या शिष्टमंडळासोबत परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव देखील मुंबईत आले आहेत.

वाचा : पाथरीच जन्मस्थळ, समिती नेमावी

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असून, या क्षेत्राच्या विकासासाठी शंभर कोटीचा निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्यानंतर शिर्डीकरांनी आक्रमक पवित्रा घेत रविवारी बंद पाळला होता. या बंदची दखल घेत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी शिर्डीतील मान्यवरांना चर्चेला बोलाविले होते. पाथरीचा जन्मस्थळाऐवजी तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे शिर्डीचे आंदोलन मागे घेण्यात आले. या पार्श्वभूमीवर पाथरीत मंगळवारी महाआरती आणि सभा घेण्यात आली.

वाचा : शिर्डीत बेमुदत बंद; साई भक्तांची गैरसोय

साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला होता. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ म्हणूनच पाथरीचा विकास करावा, असा असा ठराव या सभेत संमत झाला. यासंदर्भात पाथरीकरांचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, ते लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. 

वाचा : साईबाबांच्या जन्म वादावरून राधाकृष्ण विखे-पाटील काय म्हणाले?