Thu, Jun 20, 2019 20:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चलो अयोध्या, चलो वाराणसी...सेनेची पोस्टरबाजी

चलो अयोध्या, चलो वाराणसी...सेनेची पोस्टरबाजी

Published On: Jul 27 2018 1:48AM | Last Updated: Jul 27 2018 1:35AMमुंबई : खास प्रतिनिधी

एकीकडे महाराष्ट्रात सतत विरोध करून भाजपला जेरीस आणणार्‍या शिवसेनेने आता थेट भाजपचे बलस्थान असलेल्या उत्तर प्रदेशात आणि तेदेखील अयोध्या-वाराणसीत धडक मारण्याची घोषणा केली असून, तशी पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केल्यानंतर आता पोस्टरबाजी सुरू झाल्याने भाजपला आता आणखी मनस्ताप होण्याची चिन्हे आहेत.

अयोध्येत राममंदिर बांधण्याची घोषणा करून त्याबद्दल गेल्या चार वर्षांत काहीही न केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरले होते. आता आपली अयोध्या आणि वाराणसीत जाण्याची इच्छा असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले आहे. अयोध्येला जाण्याची आणि गंगा आरती करण्याची आपली इच्छा असल्याचे उद्धव यांनी नुकतेच जाहीर केले होते, आणि याचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला कोंडीत पकडण्यासाठीच सेनेने ही चाल खेळल्याचे दिसत आहे. उद्धव यांच्या या घोषणेमुळे आगामी निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. हाच मुद्दा तापवण्याची सेनेची चाल असल्याचे बोलले जाते. 

उद्धव हे खरोखरच अयोध्येत गेले, तर चार वर्षात तिकडे न फिरकणार्‍या भाजपाला त्यावरून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. शिवाय वाराणसी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाच मतदारसंघ असून तिथे जाऊन उद्धव यांनी टीका-टिप्पणी केली, तर मोदीविरोधकांना हवाच मिळेल, असा भाजपाश्रेष्ठींचा कयास आहे.