होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचा थेट भाजपाशी पंगा; नेमणार ग्रामीण नेते

शिवसेनेचा थेट भाजपाशी पंगा; नेमणार ग्रामीण नेते

Published On: Jan 23 2018 1:59AM | Last Updated: Jan 23 2018 1:59AMमुंबई : खास प्रतिनिधी

शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका उद्या होत असून यावेळी ग्रामीण भागातल्या नेत्यांनाही नेतेपदी नेमले जाण्याची शक्यता आहे. आता पर्यंत शहरी नेत्यांचा पक्ष म्हणून संबोधला जात असल्याने आता हे पाऊल उचलल्याचे सेनेच्या नेतृत्वाने ठरवले आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच या नेमणुका केल्या जातील. दरम्यान, आज शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली होती. नेतेपदावरून मार्गदर्शक म्हणून बढती दिली जाणार्‍या नेत्यांनाही या बैठकीस बोलावण्यात आले होते. 

शिवसेनेने आता भाजपाशी थेट पंगा घेतला असून आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच आता ताज्या दमाचे नेते आणून महाराष्ट्रभर प्रचाराची धमाल उडवून देण्याची योजना आखली जात आहे. शिवसेनेत दिवंगत शिवसेनाप्रमुखांनी आपल्या सहकार्‍यांना नेतेपदी नेमले होते. मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, दत्ताजी साळवी, दत्ता नलावडे, गजानन कीर्तिकर आदी नेत्यांनी बाळासाहेबांना सावलीसारखी साथ देऊन शिवसेनेचा पसारा वाढवण्यात हातभार लावला. आता या नेत्यांपैकी काहीजण दिवंगत झाले आहेत. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना त्यांची प्रकृती साथ देत नसल्याने पक्षकार्यात भाग घेणे शक्य नाही.

गजानन कीर्तिकर खासदार असले, तरी वयोमानानुसार त्यांनाही नेतेपदाचा भार सोसवत नाही. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे यांनी आपल्या नव्या दमाच्या    शिवबंधनानंतर बोटात वाघाची अंगठी   सहकार्‍यांना त्यातही ग्रामीण भागातील काही कार्यकर्त्यांना नेतेपदावर नेमले जाणार आहे. उध्दव ठाकरेंचे पुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्याचे निश्‍चीत झाले असून खान्देशातून गुलाबराव पाटील, मराठवाड्यातून अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातही नेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. उध्दव ठाकरे यांचे विश्‍वासू अनिल देसाई आणि अनिल परब यांच्याही नावावर चर्चा सुरू असल्याचे समजते. 

आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी या बदलांची कल्पना आपल्या ज्येष्ठ सहकार्‍यांना दिली. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत, गजानन किर्तीकर, दिवाकर रावते, रामदास कदम, आदि नेते या बैठकीला उपस्थित होते. उद्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पार्श्‍वभूमीवर आज बैठक झाल्याचे सेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शिवबंधनाच्या धाग्यापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाचा मुखवटा असलेल्या अंगठीचे वाटप सुरू झाले आहे. कुलाबा विभाग शिवसेनेच्या वतीने या अंगठ्या तयार करण्यात आल्या असून आज त्यांचे वाटप खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ आदिंच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात फूट पडू नये म्हणून उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनगटावर शिवबंधन बांधण्यास सुरूवात केली होती.  आता शिवबंधनापाठोपाठ वाघाचा मुखवटा असलेल्या अंगठ्या देण्यात आल्या आहेत.