Tue, Apr 23, 2019 09:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांसाठीही जाळी बांधणार? : शिवसेना

मुख्यमंत्र्यांसाठीही जाळी बांधणार? : शिवसेना

Published On: Feb 14 2018 12:07PM | Last Updated: Feb 14 2018 11:57AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीमुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. यानंतर नुकसानीचे पंचनामे होतील. मदतीच्या घोषणा होतील, पण कोलमडलेला शेतकरी मनाने विकलांग झाला आहे. त्याचे मन अस्थिर झाले तर नायलॉनच्या संरक्षक जाळयाही त्यास मंत्रालयात घुसण्यापासून रोखू शकणार नाहीत. सरकारच्या या उपाययोजना कुचकामी असून, आजार पोटाला आणि प्लॅस्टर पायाला अशी सरकारची अवस्था आहे, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारला लगावला आहे.

मंत्रालय हे ‘सुसाईड पॉइंट’ बनल्यापासून सरकारचेही मन अस्थिर झाल्यासारखे दिसत आहे. धर्मा पाटील या वृध्द शेतकऱ्याने आत्महत्या केल्यापासून मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताकडे संशयाने पाहिले जात आहे. प्रत्येकजण हा जणू आत्महत्या करण्यासाठीच मंत्रालयात आला आहे, असे मंत्र्यांना वाटत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्न कायमचे सुटतील व अन्यायाचे ओझे घेऊन या मंडळीना मंत्रालयाच्या पायऱ्या चढण्याची गरज पडणार नाही असा बदल सरकारच्या कामकाजात होईल असे वाटले होते. पण झाले नाही उलट मंत्रालयात होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या संरक्षक जाळया बसविण्यात आल्या. आत्महत्या हा राज्याला लागलेला डाग असून मंत्रालयाभोवती ‘नायलॉन नेट’ बांधणे हा त्यावर उपाय आहे काय असा सवालही उपस्थित केला.

धर्मा पाटील या शेतक-याने मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले होते हे लक्षात घेतले तर ‘नेट’ची ‘भिंत’ कशी कुचकामी आहे हे लक्षात येईल. राज्यात गेल्या तीन वर्षांत चार हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या घरात व शेतात झाल्या आहेत. सरकारने मंत्रालयात नायलॉनच्या जाळया बसवण्यापेक्षा धर्मा पाटील, हर्षल रावते यांच्यासारख्यांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये अशी तरतूद करायला हवी असेही या अग्रलेखात म्हटले आहे. उद्या मुख्यमंत्री किंवा मंत्री जिथे जातील तिथे त्यांच्यासभोवतीही नायलॉनची सुरक्षा जाळी बांधली जातील, असा टोमणा त्यांनी लगावला. नायलॉनच्या दोरीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे हे नायलॉनचे दोर म्हणजे अन्यायग्रस्तांची ‘आत्महत्या’ सोय आहे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.