Tue, Mar 26, 2019 23:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचा इशारा : राम कदम यांच्या वक्तव्याचे पालिकेत तीव्र पडसाद

मुलींना हात लावाल तर हात कापून टाकू

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 1:08AMमुंबई : प्रतिनिधी 

घाटकोपर येथील भाजपा आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी मुंबई महापालिका सभागृहात उमटले. काँग्रेसने उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली. मुलींना हात तर लावून दाखवा, हात कापून टाकण्याची हिंमत आमच्यात आहे, असा इशाराच शिवसेनेने यावेळी दिला. 

भाजपाला टार्गेट करण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस नगरसेवकांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून पालिका सभागृहात प्रवेश केला. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एका निवेदनाद्वारे आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. स्वत:ला राम समजणार्‍यांनी काम रावणाचे केले आहे. त्यामुळे कदम यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा. बेटी बचाव, बेटी पढाव.. म्हणणारे आता बेटी भगाव.. असे बोलू लागले आहेत. त्यामुळे मुंबईतील आपल्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का, असा सवाल यावेळी राजा यांनी केला. राजा यांचा हा मुद्दा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप लांडे यांनी उचलून धरला. रामावर विश्वास ठेवून महिलांनी राख्या बांधल्या. पण त्याच रामाने रावण रूप घेत, मुली हरण करण्याची भाषा केली. या रावणाने मुलींना हात तरी लावून दाखवावा, हात तोडून टाकू, असा इशाराच लांडे यांनी यावेळी दिला. रावणवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. महिलांचा अपमान करणार्‍या रावणाच्या ढुंगणावर लाथ मारून पक्षाबाहेर काढायला हवे होते, असा टोलाच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाला लगावला. तर सत्तेचा माज आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला. 

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी कदम यांच्या वक्तव्याचे भाजपा कधीच समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. पण पालिका सभागृहात एका सभागृहाच्या सदस्यांच्या अनुपस्थितीत चर्चा करणे योग्य नाही. महापालिका सभागृह हा राजकीय आखाडा नाही. आजवर अनेक पक्षांतील नेत्यांनी बेताल वक्तव्य केले. अशा नेत्यांची चर्चा आम्ही कधीच पालिका सभागृहात केली नाही. तुम्हाला राजकीय नेत्यांच्या बेताल वक्तव्याबद्दल चर्चा करायची असेल तर, भाजपा तयार आहे. बोरिवली येथील नगरसेविकांबद्दल बेताल वक्तव्य करणार्‍या नेत्यांची आठवण करून देत कोटक यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना बोलू न देता चर्चा आटोपती घेतली.