नेरूळ : वार्ताहर
मुंबईतील आर्थिक केंद्र आणि बुलेट ट्रेन गुजरातमध्ये नेणार्यांनी सत्यानाश करणारे रासायनिक प्रकल्प मात्र आमच्या माथी मारले आहेत. जैतापूर प्रकल्पापाठोपाठ राजापूरमध्ये आता रिफायनरी उभी राहत आहे. त्यामुळे कोकणच्या सौंदर्याचा नाश होणार आहे. या धोरणामुळे कोकणची राख होणार असून गुजरातमध्ये मात्र विकासाची रांगोळी काढली जाणार आहे. असा विकास शिवसेना कदापिही सहन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केंद्र सरकारला ठणकावले.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. यावेळी उद्धव यांच्या हस्ते सचिनदादा धर्माधिकारी यांना नवउद्योग निर्माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सुमारे 80 हजार अनुयायी उपस्थित होते. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राहुलदादा धर्माधिकारी, शिवसेना आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप, शिवसेना उपनेते विजय नाहटा, महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, गटनेते द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने, नगरसेवक शिवराम पाटील, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, किशोर धारिया, बीव्हीजीचे व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते.
महासागरात भरकटलेल्या बोेटींना किंवा जहाजांना दिशा दाखविण्याचे काम दीपस्तंभ करतो. मात्र नानासाहेब धर्माधिकारी हे महासागरालाच दिशा दाखविणारे दीपस्तंभ होते, असे उद्गार उद्धव यांनी काढून त्यांच्यापश्चात आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांनी समाजसेवेचा जो वसा पुढे चालू ठेवला आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले. कोकणावर ईश्वरी शक्तीची कृपादृष्टी आहे. कोकणातील प्रत्येक वस्तू ही जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान निर्माण करू शकणारी आहे, असे सुरेश प्रभू यावेळी म्हणाले.