Mon, Aug 19, 2019 15:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिल्ली तख्तावर पुन्हा भगवा फडकवणार : उद्धव ठाकरे

दिल्ली तख्तावर पुन्हा भगवा फडकवणार : उद्धव ठाकरे

Published On: Apr 18 2019 2:07AM | Last Updated: Apr 18 2019 1:36AM
मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस आघाडीच्या सरकारने केंद्र व राज्यात सत्तेवर असताना एवढे घोटाळे केलेत की, एक बाराखडी तयार होईल. त्यांच्या काळातील घोटाळे आठवा, मग विचारा लाज वाटते का? असा घाणाघाती आरोप शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगूरनगर-गोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केला. दिल्ली तख्तावर पुन्हा भगवा फडकावणार असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस आघाडी सरकारच्या वेळचा सिंचन घोटाळा, टॉयलेट पेपर घोटाळा, शेण घोटाळा करणार्‍यांनी राफेल व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली याची कीव वाटते. परदेशी व्यक्ती पंतप्रधानपदी नको म्हणून शरद पवारांनी विरोध केला तेव्हा काँग्रेसने त्यांना लाथ मारली, आज तेच पवार राहुल गांधी-सोनिया गांधी यांच्या बरोबर आहेत. तेव्हा लाज वाटत नाही का? अशी बोचरी टीका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.

महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर संजय निरूपम नावाचा पळपुटा उभा असून, उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघातून मतदार इथूनही त्याला पळवून लावतील, असे मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी ठासून सांगितले. रिपब्लिकन जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे महायुतीचे मुंबईतील सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वास रिपाइं (आ) पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर आणि रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केला. 

शिवसेनेच्या अच्छे दिनचे पोस्टर समाज माध्यमांत व्हायरल

महागाई आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नांवर भाजप विरोधात थेट रस्तावर उतरणारी शिवसेना आता समाज माध्यमांत आपल्या जुन्या पोस्ट आणि आंदोलनामुळे ट्रोल होत आहे. शिवसेनेने संपूर्ण राज्यभर लावलेले अच्छे दिन चे पोस्टर आता समाज माध्यमांत विरोधकांकडून पुन्हा वापरण्यात आल्याने शिवसेना नेटिझन्सच्या निशान्यावर आली आहे. 

मागील लोकसभा निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर शिवसेना अडगळीत पडली होती. परिणामी शिवसेनेने प्रत्येक मुद्द्यावर भाजपला घेरण्यासाठी संपूर्ण राज्यभर पोस्टरबाजी करुन गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किमतीची आघाडी सरकार आणि भाजपासरकारच्या काळातील तुलनात्मक आकडेवारी दाखबून हेच अच्छे दिन का असा प्रश्‍न विचारणारे पोस्टर झळकले होते. मात्र भाजपवर टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युती होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे राहण्याचे सांगत आहेत. महागाई आणि शेतकरी प्रश्‍नांवर भाजप विरोधात थेट रस्तावर उतरणारी शिवसेना आता सोशल मिडियावर आपल्या जुन्या पोस्ट आणि आंदोलनामुळे ट्रोल होत आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली असली तरीही मागील चार वर्षांत एकमेकांवर केलेल्या आरोपाच्या पोस्ट आता सोशल मिडियावर व्हायरल होिऊ लागल्या आहेत. भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई झाल्याचे आरोप शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी करण्यात येते होते.