Fri, Apr 26, 2019 16:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेचा वर्धापन दिन आज; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

सेनेचा वर्धापन दिन आज; उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:27AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीनंतर भाजप — शिवसेना आगामी निवडणुका एकत्र लढणार का? याबाबत उत्सुकता असताना शिवसेनेच्या मंगळवारी 19 तारखेला होणार्‍या वर्धापन दिनी शिवसेना लोकप्रतिनिधी आणि पदाधिकार्‍यांच्या शिबिरात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिवसभराच्या या शिबिरात होणार्‍या विविध सत्रांमध्ये शेतकरी प्रश्‍न, महागाईचा विस्फोट, विकासाच्या नावाखाली अरिष्टे अशा विविध विषयांची रेलचेल असल्याने या शिबिरातून मित्रपक्ष भाजपच टार्गेट होण्याचे संकेत आहेत. 

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराचा समारोप उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यावेळी ते काय बोलतात, आपल्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना कोणते आदेश देतात याबाबत उत्सुकता आहे. अमित शहा यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतरही शिवसेनेने स्वबळाचा नारा कायम ठेवला आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना नेत्यांकडून मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुका जवळ येऊ घातल्या असून या निवडणुकांच्या तयारीवर उद्धव ठाकरे यांचा रोख असणार आहे. या शिबिरात प्रत्येक बूथवर मतदारांची नावे नोंदविण्याबाबत शिवसेना नेते मनोहर जोशी आणि उपनेते विश्‍वनाथ नेरुरकर मार्गदर्शन करणार आहेत.