Mon, Mar 25, 2019 02:48
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचे पुन्हा मराठीकार्ड!; मराठी पाट्यांसाठी आक्रमक

शिवसेनेचे पुन्हा मराठीकार्ड!; मराठी पाट्यांसाठी आक्रमक

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 1:05AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

शिवसेना पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुंबईतील मराठी पाट्या आणि बिल्डरांकडून होत असलेल्या नामकरणाच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिले. मुंबईचा प्रारुप विकास आराखडा (डीपी) हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असताना राज्य सरकारने तो इंग्रजीत प्रसिद्ध केला. मराठीच्या या गळचेपीबद्दल शिवसैनिकांनी सजग राहावे, असे ते म्हणाले. 

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक तयारीसाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची शिवसेना भवनात बैठक घेतली. यावेळी बिल्डरांकडून मुंबईतील विविध विभागांची नावे बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अप्पर वर्ली, अप्पर लोअर परेल, न्यू कफ परेड, अप्पर जुहू अशी नावे दिली जात आहेत. आपल्या फायद्यासाठी बिल्डर बिनदिक्कतपणे शहरातील नावे बदलत आहेत. विकासक आपल्या प्रकल्पांच्या जाहिरातीत मुंबईतील जागांची नावे मुद्दाम बदलत आहेत. नाव बदलण्याचा हा घाट महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या. विकासक ऐकत नसेल तर प्रसंगी विकासकाला शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्या, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले. शहरातील पाट्या या मराठीतच असाव्यात यासाठी आपापल्या ठिकाणी जागृत राहावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठीतून पाट्या दिसणार नाहीत तेथे शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. 

मतदारांशी आतापासून संपर्क वाढवा

शिवसेना निवडणुका स्वबळावर लढणार असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पदवीधर मतदार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार हे सार्वत्रिक निवडणुकीतही मतदार आहेत. या मतदारांची यादी तयार करून त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवा. आतापासून निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आवाहन उद्धव यांनी केले. 

सेनाप्रमुखांचे ज्येष्ठ शिलेदार एकत्र

राजेश सावंत

शिवसेना वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे पाच दशकापूर्वीचे बाळासाहेबांचे सहकारी शिवसैनिक एकत्र येणार आहे. शिवसेनेची सूत्रे तरुण नेतृत्वाच्या हातात आल्यानंतर दुरावलेला ज्येष्ठ शिवसैनिक प्रथमच एकत्र येणार असल्यामुळे शिवसेनेतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे शनिवार 16 जून रोजी दादर पश्‍चिम येथे होणार्‍या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या संमेलनाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेची 1966 मध्ये स्थापना झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खादा लावून महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसैनिक सध्या शिवसेनेपासून दुरावले आहेत. बाळासाहेबांच्या एका आदेशावर भिडणारे हे शिवसैनिक का दुरावले गेले, यावर चर्चा होणार असल्याचे समजते. मुंबईत पाच दशकांपूर्वी शिवसेनेचा दबदबा होता. शिवसेनेच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होत नसे. शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली की, मुंबईतील एकही दुकानदार आपले दुकान उघडायची हिंमत करत नसे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचा चित्रपट दादरच्या कोहिनूर सिनेमागृहात प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. त्यावेळी बाळासाहेबांसह ज्येष्ठ शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून दादांचा सिनेमा प्रदर्शित करण्यास भाग पाडले होते.

आज ती शिवसेना दिसत नसल्याची खंत ज्येष्ठ शिवसैनिकांनी अनेकदा व्यक्त केली आहे. शिवसेनेमध्ये सत्तेसाठी आलेली लाचारी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना बघवत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे शिवसैनिक गेल्या दशकापासून शिवसेनेपासून दुरावले आहेत. पण आपण सच्चे शिवसैनिक असल्याचा त्यांना आजही अभिमान वाटत आहे. असे शिवसैनिक आता हातावर मोजण्याइतके राहिले आहेत. अनेकांचे वय 75 ते 80 च्या घरात पोहोचले आहे. असे सुमारे 150 ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेबांच्या आठवणीच नाही तर, पूर्वीची शिवसेना व आताची शिवसेना यावर गप्पा मारण्यासाठी दादर येथील देवराज सभागृहात सायंकाळी 6 वाजता एकत्र येणार आहेत.