Wed, Jan 23, 2019 12:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसैनिक करणार वर्षासमोर जेलभरो

शिवसैनिक करणार वर्षासमोर जेलभरो

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 2:03AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथे शिवसेना उपशहरप्रमुखासह दोन शिवसैनिकांचे झालेले हत्याकांड आणि शिवसैनिकांवरील कारवाईच्या निषेधार्थ अहमदनगर येथील शिवसैनिक मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर जाऊन स्वतःला अटक करवून घेणार आहेत. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 25 एप्रिलला केडगावला जाऊन कोतकर व ठुबे या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, खा. सदाशिव लोखंडे, शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे यांच्यासह अहमदनगरमधील शिवसेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. केडगाव येथे घडलेल्या हत्याकांडाची आणि त्यानंतर घडलेल्या परिस्थितीची माहिती त्यांना देण्यात आली. 7 एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाल्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको आणि दगडफेक केली होती. याप्रकरणी 600 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आता या शिवसैनिकांना केव्हाही अटकेची शक्यता असल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंना सांगण्यात आले.

या घटनेनंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केडगावला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे रामदास कदम यांनी सांगितले होते. मात्र, हत्या झालेल्या शिवसैनिकांचा दहावा झाल्यानंतर शिवसैनिकांना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. त्यावर रामदास कदम, एकनाथ शिंदे, विशाखा राऊत आणि किशोरी पेडणेकर यांना सोमवारी अहमदनगरला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.