Thu, Jul 18, 2019 02:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची सरशी

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची सरशी

Published On: Jun 29 2018 1:36AM | Last Updated: Jun 29 2018 7:56AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. मुंबई पदवीधर मतदार संघात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे विलास पोतनीस मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार अ‍ॅड. अमित मेहता यांचा पराभव केला. तर मुंबई शिक्षक मतदार संघात शिक्षक भारतीच्या कपिल पाटील यांनी तिसर्‍यांदा विजय मिळवित हॅट्ट्रिक साधली.

कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे निरंजन डावखरे विजयी झाले त्‍यांनी शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभ केला तर, नाशिक शिक्षक मतदार संघातही शिवसेनेचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. 

वाचा :  भाजपने केले कोकण पदवीधर मतदारसंघ 'डाव' खरे

विधान परिषदेच्या चार जागांसाठी 25 जून रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. मुंबईत पदवीधर मतदार संघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी अपेक्षेप्रमाणे सहज विजय संपादन केला. भाजपने अ‍ॅड. अमित मेहता यांना उमेदवारी देत आपली ताकद निवडणुकीत झोकून दिली होती. मात्र, शिवसेनेने या मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. दुसर्‍या फेरीअखेर विलास पोतनीस यांना 19 हजार 354, तर अमित मेहता यांना 7  हजार 792 मते मिळाली होती.

मुंबई शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार कपिल पाटील यांनी हॅट्ट्रिक साधली. विजयासाठी पहिल्या पसंतीची 3 हजार 951 मते हवी होती. मात्र, कपिल पाटील यांना 3 हजार 751 मते मिळाली. मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने पसंतीक्रमाची मते मोजण्यात आली. त्यामध्ये कपिल पाटील यांचा विजय झाला. या विजयामुळे कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. कोकण पदवीधर मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते. 

सुमारे 1 लाख 4 हजार मतदारांपैकी 77 हजार मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला होता. तिसर्‍या फेरीत भाजपच्या निरंजन डावखरे यांनी 21 हजार 528 मते घेत शिवसेनेच्या संजय मोरे यांच्यावर विजयी आघाडी घेतली. मोरे यांना 18 हजार 540 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनीही 10 हजार 381 मते घेतली होती. नाशिक शिक्षक मतदार संघातही शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी आघाडी घेतली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असलेले संदीप बेडसे दुसर्‍या स्थानी होते.