होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालाडमध्ये शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या

आणखी एका शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Published On: Apr 23 2018 12:29AM | Last Updated: Apr 23 2018 12:29AMमालाड/मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकार्‍यांच्या हत्यांचे सत्र सुरुच असून मालाडमध्ये सेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत (46) यांची गोळ्या झाडून रविवारी रात्री हत्या करण्यात आली. 

येथील एका एसआरए प्रकल्पाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून कुरार पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे मालाड परिसरात तणावाचे वातावरण आहे. रुग्णालयाबाहेर अणि सावंत यांच्या घराजवळ पोलीस बदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

मालाडमधील आप्पापाडा परिसरात येणार्‍या शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख असलेले सचिन सावंत हे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कांदिवलीतील आकुर्ली रोडवरुन बुलेटने जात होते. ते येथील गोकूळनगरात पोहचताच रस्त्याच्याकडेला दबाधरुन बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर चार राऊंड फायर केले. यातील दोन गोळ्या लागून सावंत गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ त्यांना उपाचरांसाठी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

> कांदिवलीच्या समतानगरमधील सेनेचे माजी नगरसेवक अशोक सांवत यांची जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच प्राणघातक हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. 

> काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातील पोटनिवडणूकीच्या वादातून सेनेच्या दोघां नेत्यांची हत्या झाली. 

> भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आला.

> 2009 साली देखील अशाच प्रकारे सचिन सावंत यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातून ते वाचलेे होते. 

Tags : Shivsena, Leader, Attack, Shot, Dead, Malad, Mumbai, Kandivali