Thu, Jul 18, 2019 20:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचे 'अच्छे दिन' येतील? शिवसेनेला तर 'भरवसा नाय'

काँग्रेसचे 'अच्छे दिन' येतील? शिवसेनेला तर 'भरवसा नाय'

Published On: Mar 15 2018 11:10AM | Last Updated: Mar 15 2018 10:50AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विरोधी पक्षाच्या नेत्यांना डिनरसाठी आमंत्रित करून भाजपविरोधात मोर्चेबांधणी करणाऱ्या काँग्रेसचे 'अच्छे दिन येतील याची शंका वाटते, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंनी व्यक्त केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून त्यांनी सोनिया गांधीच्या 'डिनर डिप्लोमेसी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विरोधी पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधींसोबत फोटो काढले असले तरी त्यांच्यात भाजपविरोधात उभे राहण्याची धमक दिसली नाही, असे शिवसेनेच्या अग्रलेखातून म्हटले आहे. काँग्रेसची ही मोर्चेबांधणी मोदी सरकारच्या निष्फळ सर्जिकल स्टाइकप्रमाणे ठरेल,  असा अंदाज वर्तवत शिवसेनेने भाजपवरही निशाणा साधला.

सोनिया गांधी यांनी दिल्लीत नुकतेच विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. विरोधी पक्षांतील अनेक छोट्या मोठ्या पक्षातील नेत्यांनी यासाठी हजेरी लावली. 'सामना'च्या अग्रलेखात लिहिलय की, सोनियां गांधी भाजपविरोधात मजबूत आघाडी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच अजेंडा नाही. त्यामुळे भोजनभाऊंच्या साथीने त्या भाजपला रोखण्यात यशस्वी ठरतील, असे वाटत नाही. 

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का बसला असला तरी त्यांना शह देण्यासाठी आवश्यक असणारा चेहरा काँग्रेसकडे नाही. सोनियांचा मान राखून डिनरला आलेल्यांच्या संख्याबळाचा विचार केल्यास भाजपविरोधातील संख्याबळ दीडशेचा आकडाही पार करत नाही, अशा शब्दांत 'सामना'तून काँग्रेसच्या स्वप्न सत्यात उतरणे कठीण असल्याचे मत मांडण्यात आले आहे. सर्जिकल स्ट्राइकमुळे पाकिस्तानचे वाकडे काहीच झाले नाही अशा शब्दांचा वापर केला. भाजपवरचा राग व्यक्त करत सोनियांनी बोलावलेल्या भोजनभाऊंची अवस्थाही सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे होऊ शकते, असा उल्लेख अग्रलेखात करण्यात आला आहे.