Tue, Nov 19, 2019 14:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दिवेआगर : समुद्र किनार्‍यावर शिंपल्यांची चादर

दिवेआगर : समुद्र किनार्‍यावर शिंपल्यांची चादर

Published On: Jun 24 2019 3:49PM | Last Updated: Jun 24 2019 4:08PM
रायगड : प्रतिनिधी

दिवेआगर व वेळास खाडी भागाच्या संगमावरील समुद्र किनारी वायू चक्रीवादळामुळे हजारोंच्या संख्येने शिंपल्या किनार्‍यावर आल्याने शिंपल्याची जणू चादर पसरल्याचे चित्र आहे. या शिंपल्या वेचण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनार्‍यावर मोठी गर्दी केली आहे. समुद्र किनारी पसरलेल्या या शिंपल्याने दिवेआगरच्या समुद्राचे सौदर्य खुलून निघाले आहे. समुद्रात झालेल्या वायू चक्रीवादळाचा फटका समुद्र किनारी बसला नसला तरी शिंपल्याना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे.

समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल झाला होता. या बदललेल्या वातावरणामुळे अजस्त्र लाटा समुद्रात व किनार्‍यावर धडकत होत्या. समुद्रातील उसळणार्‍या लाटा किनार्‍यावर येत असल्याने समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्र किनारी लाटाद्वारे आले आहेत. वायू चक्रीवादळाच्या तडाख्याने लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत. समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनार्‍यावर शिपल्याचा सडा पसरलेला दिसत आहे.

दिवेआगर समुद्र किनारी गेल्या दोन दिवसांपासून हे शिंपले आल्याने पर्यटकांनी व स्थानिकांनी मोठी गर्दी केली. पर्यटक व स्थानिक नागरिक हे शिंपले घरी नेत आहेत. मात्र समुद्रातून किनार्‍यावर आलेले हे शिंपले खाण्यासाठी चविष्ट नाहीत. मात्र शोभिवंत वस्तू बनविण्यासाठी या शिपल्यांचा उपयोग होऊ शकतो. समुद्र किनारी पसरलेल्या या शिंपल्याने दिवेआगरच्या समुद्राचे सौदर्य खुलून निघाले आहे. 

पावसाळी वातावरण तसेच आता येऊन गेलेले वायू चक्रीवादळ हे वादळ किनार्‍यावर धडकले नसले तरी वार्‍याचा वेग हा जास्त होता. त्याचबरोबर पौर्णिमा जवळ असल्याने समुद्राला भरती होती. त्यामुळे शिंपले किनार्‍यावर आले आहेत. भरतीचे पाणी कमी न झाल्याने शिंपले हे किनार्‍यावरच राहिले. त्यामुळे किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात शिंपले आले आहेत. समुद्रातील हालचाली, पावसाळी वातावरण, वादळामुळे निर्माण झालेला वार्‍याचा वेग व पाण्यातील करंट यामुळे शिंपले किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत.

-अभयसिंह शिंदे इनामदार, सहायक आयुक्त, मत्स्यविभाग