होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'शीला दीक्षित यांच्या निधनाने स्त्री हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्त्व हरपले'

'दिल्लीची रणरागिनी हरपली'

Published On: Jul 20 2019 8:08PM | Last Updated: Jul 20 2019 8:11PM




नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनामुळे महिलांच्या हक्कासाठी झटणारी दिल्लीची रणरागिणी ठरलेले व्यक्तीमत्त्व हरपले आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. यासोबतच त्‍यांनी दिवंगत शीला दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

शीला दीक्षित या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ नेत्या होत्या. त्यांनी तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपद भूषविले होते. तसेच त्या केरळच्या राज्यपाल सुद्धा राहिल्या होत्या.  केंद्रीय मंत्री म्हणून त्‍यांनी काम केले होते. त्या मुख्यमंत्री असताना त्यांनी दिल्लीच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महिला गुणवत्तेत पुरुषांपेक्षा कमी नाही हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले.  

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे भारतीय स्त्रियांना समान अधिकार दिला या जाणिवेतून त्या सदैव समतेच्या पुरस्कर्त्या राहिल्या. युनोमध्ये त्यांनी भारतीय स्त्रियांचे पाच वर्षे प्रतिनिधित्व केले. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी तसेच स्त्रियांवर होणार्‍या अन्याय अत्याचार विरोधात लढणार्‍या त्या नेत्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांना विश्वास होता. दिल्लीतील रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात गरिबांच्या झोपडीवासियांच्या प्रश्नांवर दिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना भेटण्याचा योग आल्‍याचा रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. 

राजकारणातील महिला शक्तीच्या त्या प्रतिक होत्या. एखाद्या महिलेने जिद्दीने राजकारणात, समाजकारणात ठाम भूमिका घेऊन काम केल्यास मुख्यमंत्री पदाची मजल गाठता येऊ शकते ही हिम्मत त्यांनी त्यांच्या जीवनातून स्त्रियांना दिली आहे. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्लीतील महिलांना प्रेरणा देणार्‍या महिला शक्तीचे प्रतिक हरपले आहे, अशी शोकभावना रामदास आठवले यांनी  व्यक्त केली आहे.