होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हो, मी इंद्राणी, पीटरला ओळखू शकतो!

हो, मी इंद्राणी, पीटरला ओळखू शकतो!

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

हो, मी इंद्राणी मुखर्जी आणि पीटरला आजही ओळखू शकतो, ते तिथे बसले आहेत. दोघांनीही 2012 मध्ये एका हरवलेल्या नातेवाईकाला शोधण्याची विनंती मला केली होती. परंतु काही दिवसांनी ती व्यक्ती सापडली असून शोधकार्य थांबवा, अशीही विनंती केली. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. ती व्यक्ती शीना बोरा असल्याचे आपल्याला 2015 मध्ये खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर समजल्याचा दावा मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहआयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी न्यायालयासमोर केला. 

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये साक्षीदार म्हणून भारती न्यायालयात हजर झाले होते. मंगळवारी त्यांची वकिलांकडून उलट तपासणी होणार आहे.

विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात (एफआरआरओ) 2002 ते 2007 या काळात माझी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी इंद्राणी आणि पीटर पासपोर्ट, तसेच व्हिसाची मुदत वाढविण्यासाठी कार्यालयात येत होते. त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली होती. 2012 मध्ये माझी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा एप्रिल महिन्यात पीटर आणि इंद्राणी त्यांच्या एका हरविलेल्या नातेवाईकचे मोबाईल टॉवर लोकेशन शोधण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते. दोघांनीही विनंती केल्यानंतर मी अलखनुरे नावाच्या अधिकार्‍याला त्या मोबाईलचे टॉवर लोकेशन शोधण्यास सांगितले. 

अलखनुरे यांनी केलेल्या तपासानंतर इंद्राणी आणि पीटरला त्या मोबाईलच्या लोकेशन बाबत आमच्याकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी इंद्राणी आणि पीटरने ती हरविलेली व्यक्ती सापडल्याची माहिती मला देत तपास थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार अलखनुरे यांना मी तपास थांबवायला सांगितला. 2015 मध्ये जेव्हा मी खार पोलीस ठाण्यात गेलो, तेव्हा शीना बोरा हत्याकांडातील तो मोबाईल नंबर इंद्राणी आणि पीटरने माझ्याकडे त्यावेळी लोकेशन शोधण्यासाठी दिल्याचे समजले, भारती म्हणाले. आता उद्या मंगळवारी बचाव पक्षाच्या वकिलाकडून भारती यांची उलट तपासणी घेतली जाणार आहे.