मुंबई ः पुढारी वृत्तसंस्था
रेल्वे प्रवासादरम्या मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडतात. रोज साधारण 35 ते 40 तक्रारी दाखल होत असतात. पोलिसांची भानगड नको म्हणून तक्रारी दाखल होत नाहीत. चोरीच्या घटनांत 70 ते 80 टक्के चोर्या या मोबाईलच्या असतात. अँड्रॉईड फोनची काही टूल्स अॅक्टिव्हेट केली तर चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढणे सोपे जाते.
लोकलमध्ये मोबाईल चोरीला जाणे ही तशी नित्याचीच बाब. मात्र अंधेरीच्या एका 19 वर्षीय शिक्षिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चोरीला गेलेला अँड्रॉईड मोबाईल तर परत मिळवलाच शिवाय चोरट्यालाही पकडून दिले. विशेष म्हणजे हा चोरटा मुंबई सोडून जाण्याच्या प्रयत्नात असताना, रेल्वेतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. झीनत बानू हक ही मरोळची रहिवासी असून ती त्याच परिसरात शिक्षिका आहे. रविवारी मालाडहून परतत असताना तिचा शाओमी 4 ए हा अँड्रॉईड हँडसेट चोरीला गेला. तो नक्की कुठून चोरीला गेला, ते तिला आठवत नव्हते. मात्र तिने गूगलला लॉग इन केले होते. आणि त्या फोनवर लोकेशन टर्न ऑन केले होते.
तिच्या चोरीला गेलेल्या फोनमध्ये गूगल अकाऊंटला माय अॅक्टिव्हिटी म्हणून एक विभाग आहे. तिथून भेट दिलेली संकेतस्थळे, पाहिलेले व्हीडिओ, केलेल्या सर्च पाहता येतात. फोन चोरीला गेल्यानंतर झीनतने दुसर्या मोबाईलवरुन गूगल अकाऊंटमध्ये लॉग इन केले. या फोनमधून तिने चोरीला गेलेल्या फोनमधील अॅक्टिव्हिटींचा माग काढला. त्या फोनवर रजनीकांतच्या काला चित्रपटातील गाणी सर्च केली होती. मोबाईल चोरट्याने शेअर इट अॅप वापरले होते. व्हॉट्स अॅप मेसेंजर अपडेट केला होता आणि फेसबुक पाहिले होते. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी त्याने एक अॅपही डाऊनलोड केले होते.
तोपर्यंत मोबाईलची बॅटरी संपत आली. चोरट्याने दादर ते तिरुवन्नमलाई एक्स्प्रेसचे रविवारचे तिकीट काढल्याचे झीनतच्या लक्षात आले. त्याने तिकिटाच्या स्क्रीन शॉटसह आपला फोटोही काढला.
झीनतने गूगल फोटोजच्या माध्यमातून त्या तिकिटाचा तपशील आणि मोबाईल चोरट्याचा फोटो मिळवला. चोरट्याने ज्या ट्रेनचे तिकीट काढले होते, ती पुदुचेरी एक्स्प्रेस असून ती दादरहून रविवारी रात्री 9.30 ला सुटणार होती. झीनत दादरला पोहोचली. तिथे तिने आरपीएफशी संपर्क साधला. लोकेशन ऑप्शनवरुन तिने चोरट्याचा माग काढणे सुरुच ठेवले होते. चोरटा सेल्वराज शेट्टी आपल्या जागेवर बसताच पोलिसांनी त्याला जेरबंद केले.