Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शशी कपूर अनंतात विलीन

शशी कपूर अनंतात विलीन

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:15AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

हिंदी सिनेमासृष्टीचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी बारा वाजता सांताक्रूझ पश्‍चिम येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र कुणाल कपूर यांने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

मंगळवारी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या कोकीळाबेन अंबानी रुग्णालयातून त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळून जुहू येथील निवासस्थानी आणण्यात आले. पृथ्वी थिएटरजवळून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांची अंत्ययात्रा सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत पोहोचली. मुंबई पोलिसांनी शशी कपूर यांना बंदुकांच्या तीन फैरी झाडून शासकीय इतमामात निरोप दिला. 

अंत्यविधीसाठी हिंदी, मराठी-चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शहा, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, सरोज खान, सलीम खान, शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, दिग्दर्शक राकेश मेहरा, रत्ना पाठक-शहा, अभिषेक बच्चन, लारा दत्ता, मकरंद अनासपुरे, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत कपूर कुटुंबीय राजीव कपूर, रणबीर कपूर, ऋषी कपूर आदी उपस्थित होते.

शशी कपूर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.