Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘शारदाश्रम’च्या नामांतराला परवानगी देणे अधिकार्‍याला पडणार महागात 

‘शारदाश्रम’च्या नामांतराला परवानगी देणे अधिकार्‍याला पडणार महागात 

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी 

दादर पश्‍चिमेकडील भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम शाळेचे नाव एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल करण्यास शुक्रवारी पालिकेच्या शिक्षण समितीत जोरदार विरोध करण्यात आला. नावात बदल करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीत आला असला तरी प्रत्यक्षात या शाळेला महापालिका शिक्षण विभागाने परवानगी दिल्याचा आरोप यावेळी समिती सदस्यांनी केला. त्यामुळे विभाग निरीक्षक(बिट ऑफिसर)यांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले.  

शारदाश्रम विद्यामंदिर शाळा व्यवस्थापनाने मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाला पत्र पाठवून  या शाळेचे नाव एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल असे करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नावात बदल करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी हा प्रस्ताव नावात बदल करण्याचा असला तरी, आपल्या शिक्षण विभागाने त्यांना एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल या नावाने परवानगीच देऊन टाकली असल्याचा गौप्यस्फोट केला. या शाळेने एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने फलक लावून प्रवेश प्रक्रियाही सुरू केल्याचे सांगितले.

त्यामुळे ही परवानगी देणार्‍या शिक्षणाधिकारी महेश पालकर यांना निलंबित करून याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. ही शाळा आंतरराष्ट्रीय केली जाणार अशी कोणतीही कल्पना पालकांना दिली नाही. रिझल्टच्या दिवशी मुलांना शाळेतून नाव काढून या इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची सक्ती पालकांवर केल्यानंतर यातील काही पालक आपल्याकडे आल्यानंतर ही बाब आपल्या निदर्शनास आल्याचे सांगत याची मान्यता देण्यापूर्वी जो गैरव्यवहार या प्रकरणात झाला आहे, त्याची चौकशी करून हा प्रस्ताव नामंजूर करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 

या शाळेच्या नामकरणाला राज्य शिक्षण उपसंचालकांनी परवानगी दिल्यामुळे नवीन शाळेसाठी परवानगी दिल्याचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले. मात्र विद्यमान शाळा बंद करण्यास परवानगी दिलेली नाही. याठिकाणी आरटीईअंतर्गत मैदानाची आवश्यक असून त्याप्रमाणे तिथे 2618 चौरस मीटर क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान दाखवल्याने त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनाने नवीन आंतरराष्ट्रीय शाळा जरूर सुरु करावी. परंतु विद्यमान शाळा बंद करु नये, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी दिले.

Tags : Mumbai, mumbai news, Shardashram, nomination issue,