Sat, May 25, 2019 11:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांना विखे घराण्याबद्दल इतका द्वेष का : विखे-पाटील

पवारांना विखे घराण्याबद्दल इतका द्वेष का : विखे-पाटील

Published On: Mar 15 2019 1:45AM | Last Updated: Mar 15 2019 1:45AM
मुंबई : खास प्रतिनिधी 

शरद पवार यांच्या मनात विखे घराण्याबद्दल इतका द्वेष का, असा सवाल करताना पवार यांनी बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबद्दल केलेले वक्‍तव्य दुर्दैवी असून, त्यामुळे आघाडीच्या धर्मालाच धक्‍का बसल्याने, नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारास आपण जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, अन्यत्र काँगे्रस हायकमांड देईल ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब विखे-पाटील यांच्या काळातल्या निवडणुकीची आठवण करून देताना त्यांना आपण पराभूत केले होते, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावर आज राधाकृष्ण विखे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. हयात नसलेल्यांबद्दल पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बोलणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी पवार यांना लगावला.

राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा बालहट्ट समजून आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीकडे धरला होता. मात्र, दुसर्‍याच्या मुलांचा हट्ट मी कसा पुरवू, असे सांगत पवारांनी ही मागणी फेटाळली होती.

...तर नारळ-रोलरबद्दलही बोलावे लागेल : विखे यांची थोरातांवर टीका

माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणारे बाळासाहेब थोरात कोण? असे विचारत मला थोरात यांना स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मला जे सांगायचे ते मी हायकमांडला सांगेन. वेळ आली की सिंह, नारळ आणि रोलर अशा अनेक गोष्टींवरही मला बोलावे लागेल, तेव्हा मग कुणाच्या निष्ठा किती आहेत याचाही हिशेब होईल, असे खरमरीत प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँगेे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिले आहे. त्यामुळे भाजपशी लढायचे बाजूला ठेवून आता काँगे्रेसचे नेते एकमेकांमध्येच कुरघोडीचा खेळ खेळताना दिसत आहेत.

सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर जिल्ह्यातले काँगेे्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला होता. विखे यांनी आपली काँगे्रेसनिष्ठा दाखवून द्यावी, असे सांगताना थोरातांनी विखे यांना धारेवर धरले होते. 

आज विखे-पाटील यांनी थोरात यांच्यावर प्रतिहल्ला चढवताना थोरात स्वत:ला हायकमांडपेक्षा मोठे समजतात काय, असा सवाल केला. जे सांगायचे ते मी पक्षाच्या नेत्यांकडेच सांगेन आणि वेळ आल्यानंतर थोरातांच्या पक्षनिष्ठेबद्दलही बोलेन, असाही  इशारा विखे-पाटील यांनी दिला. सिंह, नारळ, रोलर ही चिन्हे घेऊन कोण कुणाविरोधात लढले होते, यावर मलाही बोलावे लागेल, असे विखे यांनी बजावले.

मुलाच्या उमेदवारीवरून वाद झालेला नाही

आपल्या मुलाच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगताना, नगरमध्ये राष्ट्रवादीचा तीन वेळा पराभव झाला असल्यानेच ती जागा काँगे्रेसला दिल्यास ती जिंकू शकतो, असे आपले म्हणणे होते. यावर पुष्कळ चर्चा झाली. समन्वय घडवून आणण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी त्यांच्या भूमिकेवर ठाम होती आणि तोपर्यंत सुजय यांनीही निर्णय घेतला होता. सुजय यांनी आपल्याला विचारून निर्णय घेतला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 शरद पवारांनी एकदा नव्हे, दोनदा माझे वडील बाळासाहेब विखे यांच्याबद्दल उपहासात्मक विधान केले असून, त्यांचे विखे कुटुंबाबाबत चांगले मत नसल्याने आपण नगरमध्ये प्रचार करणार नाही, असे सांगताना अन्यत्र आघाडीच्या उमेदवारांसाठी मी कुठे प्रचार करायचा, हे काँग्रेस पक्ष आणि सुशीलकुमार शिंदेंच्या अध्यक्षतेखालील प्रचार समिती ठरवेल, असे ते म्हणाले.