होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला?: राणे

आरक्षणाचा विषय शरद पवार यांना आत्ताच का आठवला?: राणे

Published On: Feb 23 2018 1:42AM | Last Updated: Feb 23 2018 1:42AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या विषय शरद पवार यांना अत्ताच का आठवला? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उपस्थित करतानाच भाजप सरकारलाही मराठा आरक्षणाचा मुद्दा फार काळ लांबविता येणार नसून  येणार्‍या निवडणुकीपूर्वी आरक्षण हे द्यावेच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.  पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर प्रकट मुलाखत घेतली या मुलीखतीदरम्यान पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण लागू करण्याचे भाष्य केले होते. त्यासंदर्भात नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार यांच्याकडून  अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. यापूर्वी आरक्षणे देताना तसेच आरक्षणासाठी आंदोलने होत असताना पवारांनी कधीही असे भाष्य केले नाही. राज्यातील विविध जातीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे सर्व्हेक्षण करून 16 टक्के आरक्षण दिले गेले आहे. हे पवारांना मान्य नाही का, असा सवाल राणे यांनी केला. 

शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचाही आरक्षणाला विरोध असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण दिले तेव्हा इतर समाजानेही विरोध केला नव्हता, असे सांगून राणे म्हणाले, मराठा समाजाबरोबरच मुस्लिम व धनगर  समाजालाही आरक्षण लागू करावे, अशी मागणी राणे यांनी केली. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल मी काहीही भाकीत करु शकत नाही. कारण माझे भाकीत काही खरे ठरलेले नाही. त्यामुळे मी मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे सांगण्याचे मी धाडस कसे करु, असे राणे म्हणाले.