Fri, Aug 23, 2019 14:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शंकर गायकवाड यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून ?

शंकर गायकवाड यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून ?

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 03 2018 12:53AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील शंकर गायकवाड यांच्या हत्येचे गूढ वाढत चालले आहे. गायकवाड यांचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेली पत्नी आशा हिने चॅटींगच्या वादातून पतीची हत्या केल्याची माहिती दिली. मात्र, शंकर यांचा भाऊ किशोर गायकवाड यांनी भावाचा काटा त्याच्या नावे असलेली प्रॉपर्टी हडपण्यासाठी भावजयीने काढल्याचा आरोप केला आहे.

तिसगाव येथील श्री सद‍्गुरू कृपा इमारतीत राहणारे शंकर गायकवाड (44) 18 मे रोजी रात्री सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील काळूबाई, मांढरदेवी येथे देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, नंतर ते बेपत्ता झाले. पत्नी आशा हिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 21 मे रोजी तक्रार दाखल केली. अशातच शंकर गायकवाड यांचा भाऊ किशोर गायकवाड यांनी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले. पोलिसांनी चौकशीसाठी बेपत्ता शंकर यांची पत्नी आशा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने गायकवाड यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आशा व हिमांशू या दोघांना अटक केली. या प्रकरणातील राज सिंग, प्रीतम, जगन कोरी, राहुल म्हात्रे हे मारेकरी फरारी आहेत.

किशोर गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचे म्हटले आहे. उसाटणे येथील मिळकत एका बड्या बिल्डरला विकली. त्या मोबदल्यात काही रक्‍कम व एक फ्लॅट मिळाला. मात्र, तो शंकरच्या ऐवजी पत्नी आशा हिने स्वतःच्या नावावर केला. त्यानंतर तिसगाव येथील मिळकत भावाला न सांगता तिने अन्य एकाला देण्याची तयारी केली होती.

सीसीटीव्हीच्या वायर्सही तोडल्या होत्या...

प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी आशा परस्पर जात असल्याने शंकर व तिच्यात खटके उडत असे. शंकर बेपत्ता झाल्याची तक्रार 21 तारखेला पोलीस ठाण्यात करण्यात आली, मात्र त्याबाबत आम्हाला कळवण्यात न आल्याने हा प्रकारच मुळात संशयास्पद वाटला. भाऊ गायब होण्याच्या तीन दिवस आधी 7001 क्रमांक असलेल्या रिक्षावाल्याने मुक्‍काम ठोकला होता. त्यातच भावाच्या घरातील सर्व सीसीटीव्ही कनेक्शन्सच्या वायर्स तोडून टाकल्याचे समजले. शिवाय भावाच्या नावाने असलेल्या बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्‍कमही काढली आहे. त्यामुळे कॉल डिटेल्स, बँक खात्यांच्या व्यवहाराची देखील सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात यावे, अशीही मागणीही किशोर गायकवाड यांनी केली आहे. 

18 तारखेला काय घडले? 

शंकर यांना गुंगीचे औषध पाजून एका रिक्षात कोंबले व बदलापूरच्या पुढे रेल्वेपटरी लगत निळ्या शेडच्या परिसरात नेले. तेथे रिक्षातून उतरवून स्टम्पने मारहाण केली. तसेच चाकूने गळ्यावर सपासप वार करून शंकरची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. या घटनाक्रमानंतर सरकारी पक्षातर्फे फौजदार स्वप्नील केदार यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी लेखी तक्रार केली तक्रार करुनही जबाब नोंदवून तक्रार दाखल का केली नाही, असा सवाल किशोर गायकवाड यांनी केला आहे.